महत्त्वाकांक्षी प्रकल्प


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते येत्या १७ सप्टेंबरला सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन होत आहे. संपन्न भारताचे चित्र पुरे करण्यासाठी भारतात ज्या मोठ्या योजना डोळ्यासमोर ठेवण्यात आल्या होत्या त्यात या धरणाचा समावेश होतो. १९६० साली तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या धरणाचा भूमिपूजन समारंभ झाला होता. तेव्हा पासून सुरू झालेला या प्रकल्पाचा संघर्षमय प्रवास आज संपत आहे. एवढा काळ आपण न्यायालयीन अडथळे आणि आंदोलने यामुळे घालवला. मेधा पाटकर यांनी या प्रकल्पाच्या कामात अनेकदा अडथळे आणले. शेवटी आज हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित होत आहे.

नर्मदा नदीवरील हा प्रकल्प गुजरातेत नवगाम येथे उभारलेला असून तो जगातला दुसर्‍या क्रमांकाचा मोठा प्रकल्प आहे. अमेरिकेतला वॉशिंग्टन प्रांतातला कोलंबिया नदीवर बांधण्यात आलेला कौली डॅम हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो. त्याचा लाभ प्रामुख्याने कच्छ आणि सौराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागाला होणार असून त्यामुळे ५ लाख ६० हजार हेक्टर जमिनीला बारमाही पाणी मिळणार आहे. हे पाणी राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्याही जमिनीला मिळणार आहे. नर्मदा नदीवर ३० धरणे उभारण्याचा सरकारचा विचार असून त्यातले हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणातून वीज निर्मितीही होणार असून तिचाही लाभ गुजरातेसह तीन शेजारी राज्यांना होणार आहे.

कोणत्याही जलसंधारण प्रकल्पामागे पूर नियंत्रणाचा हेतू असतोच आणि नर्मदा नदीच्या या प्रकल्पातून हाही हेतू साध्य होणार आहे. शिवाय गुजरात सरकारने या प्रकल्पाचा एक आगळावेगळा वापर करण्याचे ठरवले आहे. धरणाच्या कालव्यावर सोलर पॅनेल टाकून त्यातून सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. सौर ऊर्जेचे अनेक फायदे आहेत पण त्याला जागा फार लागते. या अडचणीवर उपाय म्हणून हे पॅनल्स कालव्यावर टाकले जाणार आहेत. जागेची अडचण तर त्यातून सुटणारच आहे पण या पॅनलने कालवा झाकला जाईल आणि उन्हामुळे होणारा पाण्याच्या बाष्पीभवनाचा नाशही टळेल. असा हा दुहेरी फायदा देणारा प्रकल्प आहे. अशा रितीने कालव्याच्या २५ किलो मीटर लांबीचा वापर केला जाणार असून त्यातून २० मेगा वॉट वीज तयार केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरातच्या शेतकर्‍यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे.

Leave a Comment