पाकिस्तानात ख्रिश्‍चनांचा छळ


पाकिस्तानातील पंजाब परगण्यात नुकतीच उच्च न्यायालयाने एका ख्रिश्‍चन व्यक्तीला इस्लामचा अपमान केल्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली. या व्यक्तीने आपल्या मुस्लीम मित्राला व्हाटस अपवरून ईदच्या शुभेच्छा देताना एक कविता पाठवली होती. तिच्यात महंमद पैगंबराचा अवमान झाला असल्याने हा इस्लामचा अपमान समजून तिथल्या ईश्‍वरनिंदा विषयक कायद्याखाली ही शिक्षा देण्यात आली. पाकिस्तानात केवळ एक टक्का ख्रिश्‍चन आहेत पण त्यांना नेहमीच ईश्‍वरनिंदाविषयक कायद्याखाली अशा शिक्षा देण्यात येतात आणि त्यांचा छळ केला जातो. पाकिस्तानातला हा कायदा फार कडक असल्यामुळे त्याखाली शक्यतो फाशीचीच शिक्षा दिली जात असते.

या कायद्याचा नेहमीच गैरवापर होतो आणि शक्यतो आपल्या वैयक्तिक वैराचा बदला घेण्यासाठी त्याचा वापर करून आपल्या ख्रिश्‍चन प्रतिस्पर्ध्याला संपविले जाते. आता या पंजाब प्रांतातल्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या ख्रिश्‍चन व्यक्तीने जी कविता पाठवली होती ती चांगल्या हेतूने पाठवली होती पण तिच्यात बदल करून त्याच्या मित्राने त्याच्यावर खटला दाखल केला. मुळात या दोघांत वेगळाच वाद होता आणि तो एका मुलीवरून निर्माण झाला होता पण त्याचा बदला घेण्यासाठी त्याने या कायद्याचा वापर केला. या प्रकरणात स्थानिक मुस्लीम जनतेच्या भावना एवढ्या भडकवण्यात आल्या होत्या की काही लोकांनी या ख्रिश्‍चन माणसाला मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर हा खटला तुरुंंगात आणि बंद दाराआड चालवण्यात आला. हा प्रकार घडला ते गाव सारा ए आलमगीर पंजाब प्रांतात असून तिथे ख्रिश्‍चनांची काही घरे आहेत. त्यांच्या वस्तीवरही हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्या वस्तीलाही पोलिसांचे संरक्षण द्यावे लागले. आरोपीच्या नातेवाईकांच्याही जीवाला धोका होता त्यामुळे त्यांना तर पोलिसांनी आपल्याच कोठडीत ठेवले होते. त्यावरून तिथे ईश्‍वर निंदाविषयक प्रकरणात जनतेच्या भावना कशा भडकवल्या जातात हे लक्षात येते. अशा प्रकरणातल्या आरोपीला शक्यतो फाशीचीच सजा देण्यात यावी असा दबाव तिथल्या इस्लामिक संघटना न्यायालयावर आणतात. दरवर्षी निदान एका तरी ख्रिश्‍चनाला या कायद्यात अडकवून फाशीची सजा सुनावून संपवले जाते. तेव्हा हा कायदा बदलावा अशी मागणी काही उदार मतवादी लोकांनी केली आहे.

Leave a Comment