भारत आता नंबर वन


काल अहमदाबाद येथे बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी यांनी भारताने अमेरिकेच्या आधी बुलेट ट्रेन सुरू केली असल्याचा उल्लेख अभिमानाने केला आणि आपण वेगवान प्रवासाच्या साधनांच्या जोरावर गरिबीशी लढू असे म्हटले आहे. वाहनांच्या अन्य प्रकारांच्या बाबतीतही आपल्या देशाना आता मोठी झेप घ्यायला सुरूवात केली आहे. मोटार सायकली निर्माण करण्याच्या आणि विकण्याच्या कामात आता भारताने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. भारतात आता दररोज ४८ हजार मोटार सायकली विकल्या जातात. या बाबतीत आपण अमेरिकेला तर मागे टाकले आहेच पण चीनच्याही पुढे मजल मारली आहेे.

एकेकाळी सायकल हे वाहन बाळगणारा मध्यमवर्ग आता तिला सोडून मोटार सायकल वापरायला लागला आहे. म्हणून भारतात या वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. मुलगी कॉलेजात जायला लागली की तिला मोपेड घेऊन देणे आणि मुलगा कॉलेजात जायला लागला की त्याला मोटार सायकल आणून देणे हे आपण आता आवश्यक मानायला लागलो आहोत. हे वाहन आपण आता आपले गरजेचे वाहन करून टाकले आहे. शेतकरीही याचा वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणावर करायला लागले आहेत. २०१६ साली भारतात एक कोटी ७७ लाख मोटार सायकली विकल्या गेल्या असून हे आपल्या देशात अवतरत असलेल्या समृद्धीचे लक्षण आहे.याच काळात चीनमध्ये एक कोटी ६८ लाख मोटार सायकली विकल्या गेल्या आहेत.

भारतातला हा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या सुझुकी कंपनीने आता भारतातली आपली गुंतवणूक वाढवण्याचा विचार केला असून पंतप्रधान ऍबे यांच्या भारत दौर्‍यात या बाबत काही करार करण्यात आले आहेत. ही कंपनी आता गुजरातेत ३ हजार ८०० कोटी रुपयांची नवी गुंतवणूक करणार आहे. भारतात या नंतरच्या काळात विजेवर चालणार्‍या वाहनांचा वापर वाढणार आहे याचा विचार करून या वाहनांना लागणार्‍या बॅटर्‍यांचे उत्पादनही वाढवावे लागेल. म्हणून जपानच्या डेन्सो या कंपनीने लीथियम बॅटरीच्या उत्पादनाला गती देऊन या क्षेत्रात ११५० कोटी रुपयांची नवी गुंतवणूक करायचे ठरवलेे आहे. या आधी गुजरातच्याच हन्सलपूर येथे कंपनीचे बॅटरी तयार करण्याचे युनिट असून त्याचाच विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे या युनिटमधील या कंपनीची गुंतवणूक १३ हजार कोटी रुपयांवर जाणार आहे.

Leave a Comment