बँकांत नोकर कपात


ऑटोमायझेशनमुळे माणसाच्या ऐवजी यंत्रे काम करायला लागतात आणि माणसांच्या नोकर्‍या संपुष्टात येतात. किंवा कमी माणसांत अधिक आणि बिनचूक काम व्हायला लागले की मुळात माणसे नेमण्याचीच फार गरज पडत नाही. ही बाब बँकांनाही लागू आहे कारण बँकांतली बरीच कामे आता आपोआप व्हायला लागली आहेत. आपल्याला या संदर्भात केवळ संगणकाचा वापरच माहीत होता. पण आता हे प्रमाण वाढत आहे आणि अन्यही काही तंत्रज्ञाने बँकांच्या मदतीला येत आहेत. त्यात दोन तंत्रज्ञानांनी मोठा बदल होत आहे. पहिले तंत्रज्ञान आहे ते रोबोटिक्सचे आणि दुसरे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे. या दोन तंत्रज्ञानांमुळे आणखीही माणसे कमी केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेतल्या सिटी बँकेेचे माजी चेअरमन विक्रम पंडित यांनी येत्या काही वर्षात जगभरातल्या बँकांतील ३० ते ३५ टक्के नोकर्‍या कमी होणार असल्याचा इशारा दिला आहे. वॉल स्ट्रिटसारख्या अमेरिकेतल्या आघाडीच्या बँकेने ही तंत्रज्ञाने यशस्वीरित्या वापरली असून अनेक कर्मचारी कमीही केले आहेत. अमेरिकेतल्या इतर काही बँकात ही नोकरकपात झाली असून एकूण सात लाख ७० हजार लोकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. युरोपात तर १० लाख लोकांच्या नोकर्‍या या ऑटोमायझेशन मुळे संपुष्टात आल्या असून हे लोण भारतात येऊन पोचण्यासही फारसा वेळ लागणार नाही असे पंडित यांचे मत आहे. तेव्हा सर्वांनी सावध रहावे आणि नव्या तंत्रज्ञानांची माहिती करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोणत्याही तंत्रज्ञानाचे असे पहिले परिणाम नोकर कपातीतच होतात पण नंतर नंतर त्याचे फायदे दिसायला लागतात. जगात सर्वांनी कमी मनुष्यबळात जास्त काम करून घेण्यावर भर दिला आहे. त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून माणसांना कमी लागत नाही पण हीच तंत्रज्ञाने नव्या नोकर्‍यांची संधीही निर्माण करीत असतात. त्यांच्या वापराने बँकातले काम वेगाने होऊन बँकांचे व्यवहार वाढतात आणि पैसा वेगाने फिरायला लागतो. तसा तो फिरायला लागला की नवी गुुंतवणूक व्हायला लागते आणि तीच नव्या नोकरीच्या संधी निर्माण होतात. आता भारतातल्या तरुणांनी नव्या तंत्रज्ञानांचा अभ्यास करून त्यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यावर भर दिला तर हे नवे संकट आपल्यासाठी वरदान ठरू शकते.

Leave a Comment