बसला तो संपला


रामदास स्वामींनी म्हटले आहे. कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला. आपण हा कायदा पाळत तर आहोतच पण जरा जास्तच प्रामाणिकपणाने पाळत आहोत आणि थांबायला तयार नाही. पण आपण आता कामाच्या निमित्ताने एवढे एका जागी बसत आहोत की अशीच एखादी कविता करून बसण्याबाबत इशारा देण्याची वेळ आली आहे. त्या कवितेत आपल्याला बसल्या जागी कामे करणारांना थोडे उठा चालायला लागा, फार बसला तो संपला, असे सांगावे लागणार आहे. बैठी कामे हे आपल्यासाठी आवश्यकच झाले आहे कारण कष्टाची कामे कमी झाली आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांची कामे कष्टाची आणि काही काळ उठून तर काही काळ चालून करायची राहिली आहेत. बाकी सगळ्यांची कामे बैठीच आहेत.

या बैठ्या कामांनी आपल्यात अनेक विकार निर्माण केेले आहेतच पण अशी बैठी कामे करूनही हे विकार कसे टाळता येतील याचीही माहिती दिली जात आहे. पण बैठ़ी कामे करणारे लोक किती काळ एका जागेवर बसतात आणि बसून नेमके काय काम करतात यावर त्यांच्या आयुष्याची जोखीम अवलंबून आहे. अधिक काळ कामासाठी एका जागेवर बसणारे लोक लवकर मरण पावण्याची शक्यता आहे. जे लोक एकाच जागेवर सलग एक किंवा दोन तास बसतात त्यांच्या बाबतीत मृत्यूचा धोका अधिक आहे. मात्र अशी एक किंवा दोन तास बैठे काम करताना अधुन मधुन उठत असेल आणि दर अर्ध्या तासाला बसल्या जागेवरून उठून चालत असेल काही हालचाल करीत असेल तर ही लवकर मरण पावण्याची जोखीम तुलनेने कमी आहे.

तेव्हा आपण किती तास बसता याला महत्त्व आहेच पण त्यापेक्षा सलग किती वेळ बसता आणि उठबस करण्याचे वेळापत्रक कसे आहे याला महत्त्व आहे. एकुणात सांगायचे झाले तर बै़ठे काम करणे अपरिहार्यच असेल तर ते करणे भागच आहे पण ते करताना दर अर्ध्या तासाला उठावे आणि चार पावले चालावीत. उठून पाणी आपल्या हाताने घेऊन प्यावे. एखादी फाईल आपल्या टेबलावरून उचलून लांबच्या टेबलावर द्यायची असेल तरी द्यायला शिपायाला न सांगता स्वत: नेऊन द्यावी. काही लोकांना कामाच्या टेबलावरच डबा उघडून खाण्याची सवय असते. त्यांनी डबा खाण्याची वेगळी जागा ठरवावी आणि तिथे जाऊन डबा खावा. एवढ्या साध्या गोष्टींनी जोखीम कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment