प्रगतीची किंमत


मुंबईतला पाऊस थांबला आहे. पण कधी तरी थोडा पाऊस पडून जात आहे आणि हवेतला उष्मा वाढत आहे. काही ठिकाणी धुके पडल्यासारखी स्थिती आहे. शहरात बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे या धुक्यात धूळ मिसळत आहे. हे धुके म्हणजे हिवाळ्यात पडणारे सुखद धुके नव्हे. पावसाळा संपत आला असताना प्रदूषणाचा होणारा तो एक विचित्र प्रकार आहे. तो सुखद नसतो तर रोगट आहे. विशेषत: ज्या भागात रासायनिक कारखाने असतात त्या भागात अशा वातावरणाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होत असतो. ही एक प्रकारे औद्योगीकरणाची देणगीच असते. डोंबिवलीत अशा वातावरणाचे परिणाम होत असतात आणि दर आठवड्याला एकदा तरी कसला ना कसला विचित्र प्रकार घडतोच.

अशा वातावरणात फुफ्फुसाचे विकार ठरलेलेच असतात. फुफ्फुसाच्या त्रासानंतर श्‍वसनाचे विकार जडायला लागतात. मग त्यावर इलाज म्हणून प्रतिजैविके देणे वगैरे प्रकार सुरू होतात आणि त्यातून पुन्हा नवे प्रश्‍न निर्माण होत राहतात. चेंबूर परिसरात असे कारखाने खूप होते आणि त्यांच्या प्रदूषणामुळे लोकांना श्‍वसनाचे अनेक विकार होत होते म्हणून चेंेबूरला गॅस चेंबर असे म्हटले जात होते पण आता मुंबईत पसरलेल्या प्रदूषण मूलक धूर कम धुक्यामुळे हा त्रास अनेक उपनगरांनाही होत आहे आणि हजारो लोक आजारी पडायला लागले आहेत. अशा धुक्यामुळे काही वे़ळा समोरची वाहने नीट दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघात होतात. केवळ पहाटेच नाही तर सकाळी ९ वाजेपर्यंत ही समस्या टिकते आणि त्यामुळे शहराचे वेळापत्रक विस्कळीत होते.

गेल्या वर्षी दिल्लीत असे धुके निर्माण झाले होते. बीजिंग शहरालाही अशा धुक्याचा मोठा उपद्रव झाला होता. बंगळूर शहरात तर काही वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत अशा प्रदूषणाचे मोठेच विदारक परिणाम दिसून आले होते. शहरातल्या सहा वर्षांखालील मुलांपैकी २५ मुलांना श्‍वसनाच्या समस्येने घेरलेले होते. यावर उपाय नाही असे नाही. उद्योगांचे विकेन्द्रीकरण करणे हा उपाय आहे. मुंबई शहरात अनेक उद्योगांचे केन्द्रीकरण झाले आहे. आता इथे होणारे नवे उद्योग अन्य शहरांकडे हलवले पाहिजेत. सुदैवाने मुंबईत असलेल्या सोयी उपलब्ध असणारी अनेक शहरे महाराष्ट्रात आहेत. ज्या गोष्टीसाठी उद्योजक मुंबईकडे धाव घेतात त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असणारी किमान दहा शहरे महाराष्ट्रात आहेत. त्यांचा विचार करायला हरकत नाही.

Leave a Comment