झाला वादाला प्रारंभ


साहित्य संंमेलन आणि वाद यांचा न तुटणारा संबंध आहे की काय असे वाटावे एवढे वाद दरवेळच्या साहित्य संमेलनात निर्माण होत असतात. आताही साहित्य संमेलनासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या विवेकानंद आश्रमाची निवड झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी वाद निर्माण झाला. अर्थात असे वाद होत असले तरीही हे वाद अगदीच किरकोळ आणि जाणीवपूर्वक निर्माण केलेले असतात. आता या वादात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने उडी घेतली आहे. ज्या आश्रमात हे संमेलन होणार आहे त्या आश्रमाच्या स्वामींवर काही आरोप आहेत त्यामुळे तिथे संमेलन होता कामा नये अशी मागणी अंनिसने केली आहे. असे आरोप असतानाही तिथे साहित्य संमेलन घेण्याने आरोप असणारांची प्रतिष्ठा वाढते असा अंनिसचे नेते श्याम मानव यांचा आक्षेप आहे.

हा आक्षेप पूर्णपणे अतार्किक आहे कारण मुळात ज्या आश्रमाच्या स्वामींवर आरोप आहेत त्या आश्रमाने हे संमेलन घेतलेलेच नाही. संमेलन भरवणार्‍या संस्था वेगळ्याच आहेत. या आश्रमाची जागा व्यापक आहे आणि तिथे चांगल्या सोयी होऊ शकतात म्हणून त्या आश्रमाची निवड संमेलन स्थळ म्हणून करण्यात आली आहे. अंनिस ही तर्कशुद्धपणे विचार करणारी संघटना आहे. तेव्हा त्यांनी असा अतार्किक आक्षेप घेणे गैर आहे. मुळात कोणावर काही आरोप आहेत ही त्याची अपात्रता ठरता कामा नये. आरोप कोणावरही आणि काहीही करता येतात. त्यामुळे माणूस दोषी ठरत नाही. त्याच्यावर झालेले आरोप पुराव्यांनी सिद्ध व्हावे लागतात तरच त्याला अपराधी मानता येते. या आश्रमाच्या प्रमुखांवर केवळ आरोप आहेत आणि आरोप असणार्‍या कृत्यांच्या बद्दल तक्रार करायला कोणीही समोर आलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या जागेवर संमेलन होऊ नये हे म्हणणे अगदीच चुकीचे आहे.

आजवर अनेक संमेलने झाली पण त्या संमेलनाला जागा पुरवणार्‍या संस्थांच्या संचालकांचे चारित्र्य असा काही मुद्दाच समोर आला नाही मग तो आताच का काढला जात आहे ? ज्याच्या जागेत संमेलन होते तो अंनिसच्या कसोटीला उतरला पाहिजे असा काही संमेलनाचा विषय नाही. पण अंनिसचे नेते उगाच हा मुद्दा येथे उपस्थित करायला लागले आहेत. तसे तर अंनिसवरही आरोप आहेत. त्यांनी परदेशातून देणग्या स्वीकारल्या पण कित्येक वर्षांपासून त्या देणग्या कशा वापरल्या याचा हिशेब नियमानुसार सादर केलेला नाही. त्यावरून अंनिसवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तेव्हा काचेच्या घरात राहणारांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड फेकू नयेत.