आखाडा परिषदेचे अभिनंदन


आज समस्त हिंदू धर्मीयांना पहिल्यांदाच हिंदू असल्याचा अभिमान वाटला असणार कारण या धर्मात चाललेल्या अनाचाराच्या विरोधात कोणीतरी अधिकृतपणे काही तरी बोललेले आहे. कोणीही लफंगे उठतात साधू असल्याचे जाहीर करतात आणि धर्माच्या नावावर मनमानी करून धर्माची बदनामी करतात. अशा लोकांनी धर्माचा अगदी धंदा करून टाकलेला आहे. धर्म हा मानवाला आपल्या जीवनाचे सार्थक कशात आहे हे समजावून सांगत असतो आणि हे समजावून सांगण्याची जबाबदारी असणारे साधू, संत हे स्वत:ला जगण्याचे सार्थक समजलेले असतात. पैसा कमवण्यात आणि ऐषारामात राहण्यात तसेच भक्त म्हणून शरण आलेेल्या भोळ्या महिलांचे लैंगिक शोषण करण्यात धर्म नाही अशी त्यांची खात्री असतेे. म्हणूनच तुकाराम महाराजांसारखे संत कित्येक शतके लोकांच्या अत्यादरास पात्र ठरलेले असतात. तुकाराम महाराजांनीच तशी ग्वाही दिली आहे. ते म्हणतात की, टिळे, टोप्या, माळा आणि भगवे कपडे घातले म्हणून कोणी संत होत नाही. त्यागाची भावना हेच संतत्वाचे लक्षण आहे.

मात्र काही साधूंनी अगदी उच्छाद मांडला आहे. आश्रम काय, करोडांेंची माया जमवणे काय की शेकडो एकरल जमिनी मिळवण्याचा हव्यास काय हे सारे साधुत्वाच्या विरोधी वर्तन चालले आहे. असा सारा गांेंधळ सुरू असताना या उपभोगात धर्म नाही असे कोणीतरी अधिकृतपणे सांगण्याची गरज होती. या सार्‍या अधर्माची निंदा झाली नाही असे नाही. पण ती सामाजिक स्तरावर झाली. धर्माच्या व्यासपीठावरून या सार्‍या ढोेंग धत्तुर्‍याचा निषेध कधी झालेला नव्हता. तो पहिल्यांदाच झाला. आखाडा परिषदेने काल या ढोंगी साधूंचा निषेध केला आणि हे सारे १४ साधू खरे साधू नसून संधीसाधू आहेत असे जाहीर केले. आखाडा परिषद ही काही हिंदू धर्माचा निर्णय करणारी अधिकृत यंत्रणा नाही. तशी या धर्मात व्यवस्थाच नाही. पण, कोणत्या तरी धार्मिक यंत्रणेने या ढोंगी लोकांचा बुरखा फाडायला हवा होता. तसा तो आखाडा परिषदेचे प्रमुख नरेन्द्र गिरी यांना फाडला आहे. याचा परिणाम मोठा व्यापक होणार आहे कारण अशा भोंदू साधूंचे सोंग उघड करण्याचे काम चांगल्या साधूंनी केले आहे. नरेन्द्र गिरी यांचा हा निर्णय कोणीही शिरसावंद्य मानणार नाही आणि समस्त हिंदू समाज त्यांना प्रमाण मानणार नाही पण त्यांच्या या घोषणेने प्रथमच धर्माच्या एका व्यासपीठाने हे भोंदू साधू आचरतात तो धर्म नाही असे जाहीरपणे म्हटले आहे आणि जनतेने त्यांच्या नादी लागू नये असे आवाहन केले आहे.

खरे तर ही घोषणा शंकराचार्यांनी करायला हवी होती. कारण आदि शंकराचार्यांनी चार दिशांना चार मठ स्थापन करून त्यावर शंकराचार्यांची नेमणूक करतानाच त्यांनी आपापल्या भागातले धर्माचे निर्णय करावेत असे म्हटले होेते. हिंदू धर्म हा अन्य धर्माप्रमाणे एक संप्रदाय नाही त्यामुळे कोणा एका धर्माचार्यांनी दिलेला निर्णय समस्त हिंदू मानतीलच असे नाही. तरीही जे कोणी आपले निर्णय मानतील त्यांच्यासाठी तरी या शंकराचार्यांनी काही निर्णय करायला हवे होते. कोणी मानले नाहीत तरीही काही लोकांसाठी ते मार्गदर्शक होतातच. त्यावर अन्य संप्रदायाचे हिंदू वाटचाल करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. यातून निदान धर्माचे काही संघटनात्मक चित्र तरी निर्माण होईल. नाही तर जग झपाट्याने पुढे चालले आहे आणि आपण मात्र जुन्या कालबाह्य रूढी आणि परंपरांच्या चक्रात अडकून अजूनही फिरतच आहोत हे काही योग्य नाही. त्याने जनता अधोगतीस जाते आणि धर्मालाही ग्लानी येते. या ढोंगी साधूंना उघडे पाडून आणि ते खरे साधू नाहीत असे जाहीर करून नरेन्द्र गिरी यांनी या दिशेने मोठे काम केले आहे.

यावेळी गिरींनी लोकांना भोंदू साधूंच्या नादी न लागण्याचे आवाहन केले आहे. पण ते करतानाच त्यांनी दुसरे नरेन्द्र (डॉ. दाभोळकर) काय म्हणतात याचाही विचार केला पाहिजे. दाभोळकरांनी लोकांना केवळ भोंदू साधूंच्या नादी न लागण्याचे आवाहनच केले असे नाही तर लोक त्यांच्या नादी का लागतात आणि त्यांना अशा भोंदूंची भुरळ नेमकी कशी पडते याचा अभ्यास करून त्या भुरळ पाडण्याच्या युक्त्यांना उत्तरे दिली. एखादा व्यावसायिक आपला धंदा नीट चालेनासा झाला की अशा बाबांकडे जातो आणि असले निर्मल बाबा त्यांना काळ्या कुत्र्याला पांढर्‍या रविवारी लाल रंगाची खीर खायला घालण्याचा तोडगा सुचवितात. अशा तोडग्यांनी धंदा चालत नसतो हे दाभोळकरांनी सिद्ध करून दिले आणि या बाबत लोकांना चांगले सकारात्मक तोडगे सुचविले जे वैज्ञानिक होते. तेव्हा भांेंदू साधूंच्या नादी लागू नका असे केवळ न सांगता त्यामागच्या कारणांवर घाव घालावा लागेल. असा घाव घालण्याचे काम महात्मा फुले यांच्या पासून दाभोळकरापर्यंत अनेकांनी केले. आज ही समाजसुधारणेची परंपरा खंडित झाली आहे ही या समाजाची मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले असूनही अशा भोंदू बाबांचे प्रस्थही वाढत आहे. हा एक प्रकारे शिक्षणाचा पराभवच आहे. समाजप्रबोधनाची परंपरा चांगलीच आहे पण ती समाज सेवकांनी सुरू करण्याऐवजी नरेन्द्र गिरी यांच्यासारख्या सांधूंनी केली तर अधिक परिणामकारक होते.

Leave a Comment