मुले सुरक्षित हवीत


हरियाणातल्या गुरुग्राम येथे कार्यरत असलेल्या रियान आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये स्कूल बसच्या कंडक्टरने दुसरीच्या वर्गात शिकणार्‍या मुलाचा गळा चिरून खून केला. या खुनामागे लैंगिक शोषणाचे कारण असल्याचे आता निष्पन्न झाले असून या प्रकाराने मुलांच्या पालकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लहान मुले आता आपल्या शाळांत आणि घरांतही सुरक्षित नाहीत हे वास्तव समोर आले असल्याने केवळ पालकच नाही तर समाजाचे नेतृत्व करणारे नेतेही अस्वस्थ झाले आहेत. कारण यातून समाजातली नवी विकृती समोर आली आहे. लहान मुले आपल्या शिक्षकांच्या, नातेवाईकांच्या आणि आसपास राहणार्‍या तरुणांच्या विकृतीला बळी पडत आहेत.

अशा प्रकाराला एखादे मूल बळी पडते तेव्हा त्याच्या मनावर चर्रा उमटतो आणि हा धक्का त्याच्या मनात कायमचा न्यूनगंड बळावतो. म्हणून आता लहान मुलांना मुक्तपणे खेळणेही अशक्य होऊन बसले आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवून मोकळे होतात पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. त्याच्या शाळेत तो शिक्षकाच्या आणि अन्य संबंधितांच्या वासनेला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारांवर उपाय काय असा प्रश्‍न पडला आहे. खरे तर असा काही प्रकार घडणार नाही हे पाहण्याची जबाबदारी शाळेच्या व्यवस्थापनावर आहे. पण शाळांचेे संचालक बेजबाबदार झाले आहेत. त्यावर आता कडक कायदा झाला आहे.

कायदा झाला म्हणून लगेच स्थिती बदलत नाही. कायद्याच्या सोबत जनतेचे प्रबोधनही झाले पाहिजे. नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना हा पुरस्कार लहान मुलांच्या कल्याणाच्या कामासाठीच मिळालेला असल्याने त्यांनीच आता ही जनप्रबोधनाची जबाबदारी हाती घेतली आहे. ते आजपासून बालकांच्या सुरक्षेच्या हक्काचा जागर करीत देशव्यापी यात्रेवर जात आहेत. त्यांची ही यात्रा २२ राज्यांतून जाणार आहे. कन्याकुमारी पासून सुरू होणारी ही यात्रा १६ ऑक्टोबरला दिल्लीत जाऊन विसर्जित होईल. त्यांची ही यात्रा सुरू असतानाच देशाच्या अन्य भागात अशाच चार उपयात्रा काढण्यात येणार आहेत. कैलाश सत्यार्थी यांनी बालक आणि बालिकांच्या शोषणाचे अनेक प्रकार पुढे येत असल्याने अस्वस्थ होऊन ही यात्रा सुरू केली आहे. समाजात ४ ते ९ वर्षे वयोगटातल्या मुलीही सुरक्षित नाहीत ही मोठीच दुर्दैवी बाब असल्याचे त्यांंनी निदर्शनास आणून दिले आहे.

Leave a Comment