ग्रामीण भागाला मान


२०१८ चे अ. भा. मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रमात होणार असल्याचे जाहीर झाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासातली ही अभूतपूर्व घटना आहे कारण गेल्या अनेक वषार्र्ंपासून प्रथमच हा मान ग्रामीण भागाला मिळाला आहे. या ठिकाणाचे आणखी एक महत्त्व म्हणजे दिल्ली, वडोदरा अशा मोठ्या शहरांशी स्पर्धा करीत हिवरा आश्रमाने हा मान मिळवला आहे. गेल्या २० वर्षात साहित्य संमेलने भव्य व्हायला लागली होती आणि त्यामुळे ती मोठ्या शहरातच होणे शक्य असल्याचे वातावरण तयार व्हायला लागले होते. १९९६ साली तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते गोपीनाथराव मुंडे यांनी परळीत म्हणजे आपल्या मतदारसंघाच्या मुख्य गावी साहित्य संमेलन मोठ्या थाटात भरवले होते तिथून ही सुरूवात झाली.

भाजपाच्या नेत्याने असा मान मिळवलाय म्हटल्यावर शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांनी आपल्या मतदारसंघात म्हणजे मुंबईत परळीपेक्षा थाटात संमेलन भरवून दाखवले. नंतर औरंगाबाद, नगर, सोलापूर, पुणे, नागपूर अशा मोठ्याच शहरांत संमेलने होत गेली. भाजपा-सेनेच्या सरकारने साहित्य संमेलनाला २५ लाख रुपयांचे अनुदान देण्याची प्रथा सुरू केल्याने साहित्य संमेलने निदान कोटी रुपये खर्चून केली पाहिजेत असा आग्रह सुरू झाला. पुण्यातले १०० वे संमेलन तर पाच कोटीत झाले आणि साहित्य संमेलनाने कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायला सुरूवात केली. एकदा कोटीच्या गोष्टी बोलायला सुरूवात होताच एवढा निधी उभारणे हे लेखक कवींचे काम नाही अर्थात त्यासाठी नेतेच हवेत असे बोलायला सुरूवात झाली.

बघता बघता साहित्य संमेलन हे पुढार्‍यांचे होऊन बसले आणि त्यांत साहित्यिकांचा सहभाग अधिकच कमी झाला. आता हिवरा आश्रमात संमेलन होत आहे. या संमेलनाला कमी खर्च होईल अशी अपेक्षा आहे. अर्थात साहित्य संमेलनाचा खर्च कमी व्हावा याचा अर्थ ते दरिद्री व्हावे असे नाही पण थाटात साजरे करण्याच्या बदल्यात अशा संमेलनातला पैसेवाल्यांचा बडेजाव वाढावा आणि साहित्यिकांनी अंग चोेरून वावरावे असे तरी नक्कीच होता कामा नये. आश्रमाच्या रम्य परिसरात हे संमेलन होत असल्याने त्यावर थाटापेक्षा रम्यतेचा प्रभाव मोठा असेल आणि धनाढ्यांपेक्षा गुणाढ्यांची कदर अधिक होईल अशी अपेक्षा व्यक्त करू या.