विश्‍वबंधुत्व दिनाचे औचित्य


आजचा दिवस जगाच्या इतिहासात संंस्मरणीय ठरणारा आहे कारण ११ सप्टंंेंबर २००१ रोजी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला. भारतासह अनेक देशांता दहशतवादाचा धोका सतावत आहे आणि त्यापैकी अनेक देशांत नित्य दहशतवादी हल्ले होत आहेत पण अमेरिकेवर असा हल्ला व्हावा ही घटना विशेष आहे कारण अमेरिका हे समर्थ राष्ट्र आहे. अमेरिकेची सुरक्षा व्यवस्था कडक आहे. या देशात शिरकाव करून घेऊन दहशतवादी कारवाया करणे मोठे कठीणच. पण ओसामा बिन लादेन या अतिरेक्याने हे साहस केले. दोन विमाने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अनेक मजली इमारतींवर धडकवले. त्यात दोनशेपेक्षाही अधिक लोक ठार झाले आणि या दोन मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या. या इमारतीच्या निमित्ताने दहशतवादी संघटनांनी अमेरिकेचा तोरा आणि शान जमीनदोस्त केली. अमेरिकेच्या कडक सुरक्षा व्यवस्थेलाही भेदून हे काम मुठभर तरुण करू शकतात हे जगाने पाहिले.

एवढ्या समर्थ आणि सुसज्ज देशातल्या करोडो लोकांची झोप हराम करण्याचे काम हाताच्या बोटावर मोजता येईल एवढे तरुण हराम करू शकतात हे जगाने अनुभवले. ही तारीख म्हणूनच जगाच्या इतिहासात अजरामर झाली आहे. आपण ही तारीख लक्षात ठेवली पाहिजे कारण याच तारखेला १८९३ साली स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतल्या शिकागो शहरात झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत त्यांचे जगात गाजलेेले भाषण केले होते. स्वामीजी हे त्यावेळी २८ वर्षांचे म्हणजे तरुण होते. त्यांनी शिकागोच्या परिषदेत आपला परिचय करून देणारे चारच मिनिटांचे भाषण केले होते. त्यात त्यांनी तिथल्या श्रोत्यांना असे काही मंत्रमुग्ध करून टाकले की त्याच्या दुसर्‍या दिवशीच्या अमेरिकेतल्या सगळ्या वृत्तपत्रांनी त्यांचा उल्लेख योद्धा सन्याशी अशा शब्दात केले होते. अमेरिकेतल्या लोकांनी ही परिषद जगातल्या सगळ्या धर्मांची म्हणून आयोजित केली होती. अमेरिकेचा शोध १४९३ साली लागला होता आणि त्याला ४०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हे आयोजन करण्यात आले होते. जगातल्या सगळ्या धर्मांनी आपापल्या धर्मांची माहिती या परिषदेत द्यावी म्हणजे जगातले सगळेच धर्म मानवतेचाच संदेश देत असतात हे सत्य जगाला समजेल असा आपला हेतू असल्याचे आयोजकांनी म्हटले होते पण ही परिषद एका मोठ्या आयोजनाचा एक भाग होती. तिथे अमेरिकेने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचे दर्शन घडवणारे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.

या प्रदर्शनातून आपल्या प्रदर्शनाचे दर्शन घडवावे असाही हेतू या सगळ्या आयोजनामागे होताच पण सर्व धर्म परिषदेत सगळ्यांनी आपापल्या धर्माची माहिती दिली तरीही शेवटी आयोजकांच्या ख्रिश्‍चन धर्माचाच प्रभाव या परिषदेवर राहील असा अमेरिकेच्या लोकांचा विश्‍वास होता. एकुणात जगात ख्रिश्‍चन धर्म सर्वात श्रेष्ठ आहे हे जगाच्या मनावर बिंबवावे असा त्यांचा अंत:स्थ हेतू होता. त्यामागे गर्व होता, ताठा होता आणि तोरा होता. पण स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या या तोर्‍याचे मनोरे आपल्या केवळ चार मिनिटांच्या भाषणाने जमीनदोस्त केले. परिषदेला आलेला प्रत्येक प्रतिनिधी आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत होता पण, स्वामीजींनी आपला हिंदू धर्म जगातल्या सर्वच धर्मांना समान मानतो. कोणताही धर्म श्रेष्ठ नाही आणि कोणताच धर्म कनिष्ठ नाही ही हिंदू धर्माची धारणा आहे असे स्वामीजींनी म्हटले. आकाशातून पडणारे पाणी अनेक ओढ्यांतून आणि शेकडो नद्यांतून वहात जात असले तरीही शेवटी ते समुद्रालाच मिळते तसा कोणत्याही धर्माने कोणत्याही प्रकारे ईश्‍वराची आराधना केली तरीही शेवटी ती आराधना एकाच ईश्‍वराला प्राप्त होते असे ते म्हणाले.

आपले हे भाषण संपताना स्वामीजींनी सगळे धर्म हे सारखेच आहेत याचा अर्थ आपण कोणीही आपल्या धर्माचा अतिरेकी अभिमान बाळगणे आणि कोणीही कोणाच्याही धर्माचा द्वेष करणे हे अनाठायी आहे असे प्रतिपादन केले. जगातल्या सगळ्या धर्मांनी मानवताच शिकवली आहे म्हणून जगातल्या सर्वच धमार्ंंचे लोक आपल्या मनात ही भावना बाळगतील तर जगातले अनेकानेक धर्मांचे अनुयायी आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्यासोबतच इतरांच्याही धर्माचा आदर करायला शिकतील. त्यातूनच विश्‍वबंधुत्वाची कल्पना बळावेल आणि जगात शांती नांंदेल असा विश्‍वास स्वामीजींनी व्यक्त केला. ओसामा बिन लादेन याने २००१ साली अमेरिकेचा तोरा उतरवला पण त्यासाठी त्याच्या तरुण अनुयायांनी हिंसेचा वापर केला पण स्वामीजींनी अमेरिकेचा तोरा आपल्या केवळ चार मिनिटांच्या भाषणाने म्हणजेच कसल्याही शस्त्राचा वापर न करता केवळ आपल्या बुद्धीमत्तेच्या साह्याने उतरवला. म्हणून हा दिवस जगात विवेकानंद केन्द्राच्या वतिने विश्‍वबंधुत्व दिवस म्हणून साजरा होत असतो. ओसामा बिन लादेनच्या हिंसाचारी प्रयत्नांमुळे अमेरिकेला धडा मिळाला पण त्यातून त्याच्या देशाचे अमेरिकेशी कायमचे वितुष्ट आले. स्वामीजींच्या प्रयत्नाने मात्र भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध अधिक सलोख्याचे आणि मैत्रीचे झाले. दोन देशातले शत्रुत्व न वढता प्रेम वाढले. बंधुत्व वाढले.

Leave a Comment