नदी बचाव मोहीम


सध्या आपल्या नद्यांना गटारीचे स्वरूप आले आहे. आपण औद्योगिक प्रगती करीत आहोत पण या प्रगतीची किंमत अशी चुकवत आहोत. अर्थात प्रगती व्हायची असेल तर ही किंमत चुकवलीच पाहिजे असे काही नाही. पर्यावरणाचे भान राखून प्रगती केली तर प्रगतीचा वेग काही कमी होत नाही. उलट पर्यावरण नाश न करता प्रगती केली तर प्रगती आणि आरोग्य अशा दोन्हींचाही एकाच वेळी लाभ होतो. सध्या एक सद्गुरू भारताच्या दौर्‍यावर असून ते एका वाहनातून काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करीत आहेत. सत्तरी ओलांडली असली तरीही हे साधू आपले वाहन स्वत:च चालवत आहेत. त्यांनी या महिनाभराच्या दौर्‍यात लोकांना आपल्या नद्यांच्या बाबतीत सावध करायला सुरूवात केली आहे.

आपण नद्यांच्या आणि अर्थात पाण्याच्या संदर्भात काही आकडे लक्षात घेतले पाहिजेत. भारतात अनेक नद्या आहेत असे मानले जाते आणि ती वस्तुस्थिती आहे पण या नद्यांचे पाणी दरडोई अशा प्रमाणात उपलब्ध होते याचा हिशेब केला तर मोठा खेदजनक आकडा समोर येतो. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या १८ टक्के आहे. पण या १८ टक्के लोकसंख्येला जगात उपलब्ध असलेल्या गोड्या पाण्यातले केवळ ४ टक्के पाणीच मिळते. म्हणजे ते आपल्याला १८ टक्के एवढेच मिळायला हवे होते. पण जागतिक सरासरीच्या चौपटीने कमी पाणी आपल्याला मिळत आहे. १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्याला जेवढे दरडोई पाणी मिळत होते त्याच्याही चौपटीने हे पाणी कमी आहे. आपण पाण्याच्या वापराबाबत आणि नद्यांच्या शुद्धतेबाबत जागरूक राहिलो नाही तर २०३० साली आपली पाण्याची उपलब्धता निम्म्याने कमी होणार आहे. तेव्हा सावध राहण्याची गरज आहे.

त्यासाठी सद्गुरूंनी काही ठोस उपाय सुचविले आहेत. पहिला म्हणजे कोणत्याही नदीच्या दुतर्फा एक किलोमीटरचा पट्टा हा केवळ झाडे लावण्यासाठीच वापरला पाहिजे. शिवाय या पट्यात झाडे लावताना ती उत्पादक म्हणजे फळांची असतील यावर कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. आपल्या शेतांतूनही शक्यतो कामाची झाडे लावली पाहिजेत. हे न केल्यास आपल्या उपलब्ध जमिनीच्या २५ टक्के जमीन ही वाळवंट बनत आहे. त्या वाळवंटीकरणाचा वेग वाढत जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांची नदी जागृती यात्रा दक्षिणेतून कोइंबतूर येथून ३ सप्टेेंबर रोजी निघाली असून ती महाराष्ट्रात अमरावती येथे येणार आहे. तिचा शेवट २ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहेे.

Leave a Comment