पाकिस्तानच्या सततच्या कुरापती आणि दहशतवाद यांमुळे भारत त्रस्त आहे पण त्यावर उपाय काय ? त्याला जशास तसे उत्तर देणे हा उपाय याही योग्य नाही असे परिपक्व नेते सांगत असतात. ते खरे आहे. एकीकडे पाकिस्तान असे धंदे करीत असताना पण जागतिक पातळीवर त्याचे हे धंदे उघडकीस आणून जगासमोर ठेवणे आणि जागतिक राजकारणात पाकिस्तानला एकाकी पाडणे ही आपली नीती असली पाहिजे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या परिषदेच्या निमित्ताने चीनमध्ये जाऊन चिनी नेत्यांकडून पाकिस्तानला तंबी देवविली. अशा घटनांनी पाकिस्तान जागतिक राजकारणात एकाकी पडण्याची प्रक्रिया गतिमान होत असते. असाच एक प्रकार आता अमेरिकेत घडला असून पाकला दणका बसला आहे.
पाकिस्तानला दणका
पाकिस्तानची सर्वात मोठी खाजगी बँक म्हणवल्या जाणार्या हबीब बँकेला अमेरिकेतून गाशा गुंडाळायला भाग पाडण्यात आले आहे. गेली ४० वर्षे ही बँक अमेरिकेत कार्यरत होती आणि तिची मोठी शाखा न्यूयॉर्कमध्ये होती. तिच्यावर अमेरिकेचे लक्ष होतेच कारण तिच्या माध्यमातून पाकिस्तानी तसेच प. आशियात धुमाकूळ घालणार्या दहशतवादी संघटनांना पैसा पुरवला जातोय की काय असा संशय होता. २००६ पासून ही बँक अमेरिकेच्या बँक नियामक मंडळाच्या रडारवर होती. तिच्या काही व्यवहारात काही अयोग्य कामे करण्यात आली होती. अल कायदा या जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनेला पैसा पुरवणार्या अरबस्तानातल्या अल राझी या बँकेशी हबीब बँकेने व्यवहार केले होते. तेव्हाच या यंत्रणेने या बँकेला इशारा दिला होता पण तरीही बँकेचे हे उद्योग सुरूच होते. शेवटी अशीच काही कारणे हातात घेऊन या यंत्रणेने या बँकेला २० कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला आणि शेवटी गाशाही गुंडाळायला लावलो
अमेरिकेतले सरकार मग ते ओबामाचे असो की डोनॉल्ड ट्रंप यांचे असो ते आपल्या देशाच्या सुरक्षेबाबत किती सावध असते याचे अनेक अनुभव जगासमोर आहेत. विशेषत: आज म्हणजे ९ सप्टेंबरला २००१ साली अमेरिकेवर जो दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पासून ही सावधानता वाढवण्यात आली आहे. नेमक्या याच तारखेला यंदा हबीब बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेत सुरक्षेबाबत कसलीच तडजोड केली जात नाही. आपण अशी कारवाई केली तर अल्पसंख्यकांना काय वाटेल असा विचार करीत बसायला अमेरिका म्हणजे भारत नव्हे.