आयटी उद्योगाचा कसोटीचा काळ


सध्या तरी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताशी बरोबरी कोणी करू शकत नाही. या क्षेत्रात भारतातले ४० लाख तंत्रज्ञ गुंतलेले आहेत आणि त्यातून भारताला चांगला पैसा परकीय चलनाच्या स्वरूपात मिळत आहे. भारतातल्या आयटी कंपन्यांनी परदेशातही चांगला जम बसवलेला आहे पण कोणत्याही क्षेत्रात वाढीच्या अवस्थेत काही आव्हाने समोर येतात आणि काही काळ त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्या क्षेत्राला स्वत:त बदल घडवावे लागतात. आय.टी. क्षेत्रातही स्वयंचलित व्यवस्थांचे आव्हान उभे राहिले असून येत्या दोन ते तीन वर्षात त्यामुळे अनेक तंत्रज्ञांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग, सिस्टिम इंजिनियरिंग, डेटा एन्ट्री ऑपरेटिंग, आणि सर्व्हर मेन्टेनन्स अशा क्षेत्रात कंपन्यांनी माणसे कामाला लावण्याऐवजी ती कामे स्वयंचलित यंत्रणांद्वारे करायला सुरूवात केली आहे.

या यंत्रणा आवश्यक आहेत कारण त्यामुळे खर्च वाचतात पण परिणामी सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि सिस्टिम ंइंजिनिअरिंग मधील अनुक्रमे २ लाख ६० हजार आणि एक लाख ५० हजार तंत्रज्ञांच्या नोकर्‍यांवर गदा येणार आहे. अर्थात असे असले तरी आपण फार घाबरून जाण्याची काही गरज नाही कारण आयटी क्षेत्र विस्तारत चालले आहे आणि नव्या तंत्रात नव्या नोकर्‍या निर्माण होणार आहेत. ही नवी क्षेत्रे आहेत सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इन्टेलीजन्स, बिग डेटा या सारख्या क्षेत्रात तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त नोकर्‍या निर्माणही होणार आहेत. मात्र नोकर्‍या जाणार्‍या तंत्रज्ञांनी त्या ज्या क्षेत्रात निर्माण होत आहेत त्या क्षेत्रातली तंत्रे अवगत केली तर त्यांना आपल्या नोकर्‍या बदलून घेता येतील.

सिम्प्लीलर्न डॉट कॉम या कंपनीचे संचालक कश्यप दलाल यांनी ही माहिती दिली आहे. नोकर्‍या जाण्याची ही प्रक्रिया आगामी पाच वर्षात हळुहळु होईल आणि नव्या नोकर्‍याही अशाच पाच वर्षात वाढत जातील. त्या दृष्टीने भारतातील आय. टी. क्षेत्राला आगामी दोन ते तीन वर्षे कठीण आणि कसोटीची जाणार आहेत. मात्र आपण नोकर्‍या जाणारांना नव्या तंत्रांचे प्रशिक्षण देण्याची सोय केली तर आपण या कसोटीला उतरणार आहोत. भारतातल्या आय.टी.कंपन्यांना याची जाणीव आहे म्हणून त्यांनी आतापासूनच आपल्या तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करायला सुरूवात केली आहे. तेव्हा घाबरून जाण्याची गरज नाही.

Leave a Comment