सिद्रामय्या यांची चैन


कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्रामय्या हे आपण दलित आणि गरिबांचे मोठे कैवारी आहोत असा आव आणत असतात. ते आता कॉंग्रेसमध्ये असले तरीही ते पूर्वाश्रमीचे समाजवादी आहेत. त्यामुळे गरिबांच्या बाबतीत अस्सल ढोंगीपणा दाखवणे त्यांना चांगले जमते. राज्य विधानसभेची निवडणूक जशी जवळ येत आहे तसे आपल्या या प्रतिमेचे अधिकच प्रदर्शन करण्याची त्यांची घाई उडाली आहे. समाजवादी सगळीकडेच असे का असतात याचा शोध घेतला पाहिजे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव हे मुख्यमंत्री असताना त्यांना भेटायला येणारांची समोसे आणि चहा देऊन मेहमानवाजी केली जायची. त्यावर त्यांनी चार ते पाच वर्षात काही कोटी रुपयांचा खर्च सरकारच्या तिजोरीतून केला होता.

सिद्रामय्या यांचाही असाच खर्च माहितीच्या अधिकाराखाली राज्य सरकारकडे मागण्यात आला असता जे आकडे प्राप्त झाले ते पाहून डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या चहा, कॉफी, बिस्किटस आणि मिनरल वॉटर या चार सेवांपायी सरकारी खजान्यातून २४ लाख रुपये खर्चले आहेत. यात त्यांना भेटायला आलेल्या मतदारांचा आणि नेत्यांचा चहा पानाचा खर्च धरलेला नाही. हा केवळ त्यांच्या घरातल्या लोकांचा आणि चहा, कॉफी, बिस्किटस् आणि पाणी यांचा खर्च आहे. यात कुटुंबियांच्या खाण्याचा खर्च धरला तर हा आकडा ३८ लाखावर जातो. त्यांचा असा केवळ एका वर्षाचा खर्च ९ लाख झालेला आहे. भेटायला आलेल्यांचा असा सर्व खर्च धरला तर त्यांनी सरकारला ५० लाखापेक्षाही अधिक रकमेला गंडा घातला असल्याचे दिसून आले आहे.

सिद्रामय्या यांना उंची राहणीमानाची मोठी आवड आहे. तशी ती असण्याला आपला काही आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यांना असा शौक करायचाच असेल तर त्यांनी तो आपल्या खाजगी पैशातून करायला काही हरकत नाही पण ते आपली अशी खाण्यापिण्याची हौस सरकारच्या पैशातून भागवत आहेत ही गोष्ट चुकीची आहे. यापूर्वी त्यांच्या हातात पाच लाख रुपये किंमतीचे घड्याळ असल्याचे आढळले होते. गरीब जनतेसाठी काम करणार्‍या अशा नेत्याच्या हातात असे भारी घड्याळ असण्याचे काही कारण नाही. शे पाचशे रुपयांच्या घड्याळातूनही वेळ कळू शकते. पण ते पाच लाखाचे घड्याळ तर वापरतातच पण ते त्यांना कोणी दिले याचे समर्पक उत्तरही त्यांना देता येत नाही. कारण सबकुछ गोलमाल है.

व्हिडीओ सौजन्य – Amazing Hot Fun News Unbelievable Videos

Leave a Comment