आरोपाची घाई कशाला ?


कर्नाटकात बंगलुरू येथे पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. हा प्रकार होऊन २४ तासही झाले नाहीत आणि हत्येचा प्राथमिक तपास होऊन हत्येमागे हात असलेला एखादाही संशयित आरोपी सापडलेला नाही त्याच्या आतच मुंबईत काही पत्रकारांनी आणि काही विरोधकांनी लगेच या हत्येचा दोष मोदींच्या माथी मारून निदर्शनेही केली. एखाद्या घटनेचा निषेध केला जाणे साहजिक आहे पण निदान काही तपास तरी झाला पाहिजे आणि या हत्येला जबाबदार असणारांचा काही सुगावा तरी लागला पाहिजे ना ? निदर्शने करण्यासाठी निमित्तालाच टेकले असल्याप्रमाणे उतावळेपणा करणारांना एवढीही वाट पाहण्याची गरज वाटत नाही. हे काही सभ्यपणाचे लक्षण नाही. गौरी लंकेश यांची हत्या हा विचार स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे पण गौरी लंकेश यांची जी माहिती समोर आली आहे तिच्यावरून भलत्याच शंका यायला लागल्या आहेत. गौरी लंकेश या नक्षलवादी होत्या. नक्षलवादी संघटना आणि त्यांचे सहानुभूतीदार यांच्यात अनेक हत्या या गूढ कारणांनी होत असतात. हा त्यातलाच एक प्रकार असेल ही शक्यता नाकारता येणार नाही.

या निमित्ताने केन्द्रातल्या भाजपा सरकारला बदनाम करण्याची घाई झालेल्यांनी या पत्रकार महिलेला विचारवंत ठरवून टाकले आहे. गौरी लंकेश यांची हत्याही त्या केवळ पत्रकार असल्यामुळे झाली आहे का हाही संशोधनाचा विषय आहे कारण त्या विचारवंत पत्रकार नसून खंडण्या गोळा करणार्‍या पत्रकार होत्या असे कर्नाटक भाजपाने म्हटले आहे. याचाही विचार केला पाहिजे. त्या संघ परिवाराच्या टीकाकार असणार्‍या विचारवंंत होत्या तर त्यांच्या या विचाराची किती पुस्तके प्रसिद्ध आहेत याची माहिती या लोकांनी दिली पाहिजे. पण तशी काही माहिती पुढे आलेली नाही. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांंनी तर गौरी लंकेेश यांच्यात आणि त्यांच्या भावात काही मतभेद होते आणि त्यावरून काही वाद झाले होते ही माहिती तारीखवार समोर आणली आहे. या सगळ्या गोष्टींची चौकशी झालीच पाहिजे. तशी ती होईलही पण ती होण्याच्या आधीच काही लोक मोदींना जबाबदार धरून निदर्शने करण्याचीही घाई करतात यात त्यांचा राजकीय उतावळेपणाच दिसतो. गौरी लंकेश या लंकेश पत्रिके या नियतकालिकाच्या संपादक होत्या आणि त्यांचा भाजपाच्या काही नेत्याशी वाद होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी काही भाजपा नेत्यांच्या विरोधात लेखन केले होते पण ते बदनामीकारक असल्याचे सिद्ध झाल्यामुळे शिक्षाही भोगली होती. याही गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण त्यातून त्या कोणत्या प्रकारच्या संपादक होत्या यावर प्रकाश पडतो.

एखाद्या राज्यात असा प्रकार घडतो तेव्हा त्याचा राज्य सरकारशी संबंध असतो हे ध्यानात घ्यावे लागेल. कारण कायदा आणि सुुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असतो. आता डॉ. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्या या कर्नाटकात झाल्या आहेत. तेव्हा या दोन हत्यांची जबाबदारी मोदी किंवा भाजपाची नसून ती कर्नाटकात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारची आहे. पण विराधकांनी राज्य सरकार आणि केन्द्र सरकार यांच्या जबाबदार्‍यांबाबत जाणून बुजून गल्लत केली आहे. कॉंग्रेस पक्षाने तर सीमाच ओलांडली. आपल्याच पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात ही हत्या झाली असतानाही सोनिया गांधी, प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी आणि राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. खरे तर या हत्येची जबाबदारी त्यांच्याच पक्षाच्या सरकारची आहे पण सोनिया गांधी यांनी, या हत्येतून मोदी आपल्या विरोधकांचे गळे आवळत असल्याचा आरोप केला. या लोकांत सत्याची थोडीही चाड असेल तर त्यांनी आधी आपल्या पक्षाच्या कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे पण तसे न करता हे नेते काहीही संबंध नसलेल्या मोदींना दोष देत आहेत.

आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करण्यात कॉंग्रेसचे नेते कसे वाकबगार आहेत याचे हे एक उदाहरणच आहे. याच क्रमाने डॉ. नरेन्द्र दाभोळकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांची चर्चा होत असते. खरे तर डॉ. दाभोळकर यांची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार होते आणि केन्द्रातही त्यांचेच सरकार होते. पण याही हत्येबाबत ही सारी डावी मंडळी भाजपालाच दोषी धरत आहेत. या प्रकरणात केन्द्र किंवा राज्य सरकार यातल्या कोणालाही दोषी ठरवायचे झाले तरी कॉंग्रेसलाच दोषी धरावे लागेल. उत्तर प्रदेशात अखलाक नावाच्या व्यक्तीची दादरी येथे हत्या झाली. त्यामागे गोमांसाचे कारण होते असे सुरूवातीला वाटले होते पण नंतर हा प्रकार तसा नसल्याचे निष्पन्न झाले. पण तरीही याही हत्येला केन्द्रातल्या मोदी सरकारलाच दोषी धरण्यात आले. खरे तर हा प्रकार राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे आणि तो घडला तेव्हा उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे समाजवादी पक्षाचे सरकार होते. मग या बाबत मोदींंना जिम्मेदार धरणे हा खोटारडे पणा नाही का? पण उठसूट निदर्शने करणार्‍या या डाव्यांनी दादरी प्रकरणात एकदाही समाजवादी पार्टीच्या सरकारला दोषी धरले नाही. ही तर शुद्ध बनवाबनवी आहे. ती हे लोक सातत्याने करीत आले आहेत कारण त्यांना या हत्यांशी काही देणे घेणे नाही. त्यांना केवळ मोदी सरकारला बदनाम करण्याची संधी हवी आहे.

Leave a Comment