पशुवैद्यकीय अभ्यासक्रम

डॉक्टर आणि इंजिनिअर या दोन व्यवसायाखेरीज उपेक्षित राहिलेल्या अन्य चांगल्या अभ्यासक्रमांमध्ये जनावरांच्या डॉक्टरांचा जरूर समावेश करावा लागेल. आजच्या काळामध्ये प्रचंड संधी असलेला एक व्यवसाय म्हणून पशुवैद्यकी शाखेकडे पाहता येईल. कारण आपल्या देशात पशु पालनाकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. पूर्वीच्या काळी पशुपालक शेतकरी आपल्या जनावरांना अगदी अपवादात्मक प्रसंगातच डॉक्टरकडे नेत असत. परंतु आता हे पशुपालक शेतकरी आपले सारे पशुपालन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला लागले आहेत. कारण त्यांच्या व्यवसायांमध्ये संकरित जनावरांचा समावेश झाला आहे. जनावरांचे दूध थोडे जरी कमी-जास्त झाले तरी आपल्या उत्पन्नावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो याची जाणीव पशुपालक शेतकर्‍यांध्ये विकसित व्हायला लागली आहे. त्याशिवाय शेळ्या-मेंढ्या पाळणे, कुक्कुटपालन, वराह पालन आदी अनेक नवनव्या व्यवसायात शेतकरी पदार्पण करायला लागले आहेत. या सर्व व्यवसायांचे आधुनिक तंत्र अवलंबिले नाही तर त्यात यश मिळण्याची शक्यता नसते. म्हणून डॉक्टर त्यांच्यासाठी अपरिहार्य झाला आहे.

येत्या दहा-पाच वर्षामध्ये माणसांच्या डॉक्टराप्रमाणे जनावरांच्या डॉक्टरांचीही खाजगी प्रॅक्टिस सुरू झाल्यास नवल वाटणार नाही, इतक्या झपाट्याने हे क्षेत्र वाढत आहे. तेव्हा करिअर करू पाहणार्‍या हुशार विद्यार्थ्यांनी एक चांगली संधी म्हणून पशु वैद्यकीय शाखेकडे पहायला हरकत नाही. पशु वैद्यकीय पदवीधरांची शेती व्यवसायातच नव्हे तर लष्करात सुद्धा मागणी आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना या शाखेत प्रवेश मिळतो. महाराष्ट्रात पशु वैद्यकीय शिक्षण देणार्‍या पाच संस्था आहेत. मुंबई, शिरवळ जि. सातारा, परभणी, उदगीर, जि. लातूर आणि नागपूर येथे या संस्था असून शिरवळ आणि उदगीर येथील संस्थांमध्ये प्रत्येकी ३२ तर अन्य संस्थांमध्ये ६० जागा आहेत. बारावी नंतर पाच वर्षे शिक्षण घेऊन व्हेटर्नरी सायन्समधील पदवी घेता येते आणि त्यानंतर दोन वर्षे शिक्षण घेऊन पदव्युत्तर पदवीही घेता येते. पदवीव्युत्तर शिक्षणाची सोय अकोल्याच्या शासकीय पशु वैद्यकीय संस्थेमध्ये आहे.

पशु वैद्यकीय शिक्षणाची गरज अनेक क्षेत्रांमध्ये असल्यामुळे पदव्युत्तर पदवीसाठी १८ विषयात स्पेशलायझेशन करण्याची सोय अकोल्यात उपलब्ध आहे. ही पदवी घेणार्‍यांना मत्स्य व्यवसाय, जनुकीय विज्ञान, व्यावसायिक पशुपालन अशा कोणत्याही एका विशेष विषयाचा अभ्यास करता येतो. पशु वैद्यकीय शास्त्राकडे विद्यार्थ्यांचा म्हणावा तसा ओढा नाही त्यामुळे शासन या शिक्षणाला आणि विशेषत: पदव्युत्तर पदवी नंतरच्या संशोधनाला भरपूर प्रोत्साहन देत आहे. देशात दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल आणि मांसाहारी लोकांना कमी किंमतीत भरपूर मांस पुरवायचे असेल तर पशु पालनात संशोधन होण्याची गरज आहे, ही गोष्ट शासनाच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे शासन भारतातल्या पदवीधरांना परदेशात जाऊन संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्त्याही देत आहे.

Leave a Comment