नर्सिंगचा प्रगत अभ्यासक्रम

सध्याच्या काळामध्ये अनेकानेक क्षेत्रात कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारीवर्गाची मोठीच टंचाई भासत आहे. त्यातल्या त्यात वैद्यकीय व्यवसायामध्ये ही टंचाई अधिक निर्माण झालेली दिसते. तिच्यामुळे केंद्र सरकारची ग्रामीण आरोग्य योजना अक्षरश: आजारी पडलेली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये तर परिचारक आणि परिचारिका यांची तीव्र चणचण भासत आहेच. पण खाजगी रुग्णालयांना सुद्धा परिचारिका मिळवताना नाकीनव येत आहेत. म्हणून नर्सिंगच्या व्यवसायात प्रचंड संधी आहे. त्यातल्या त्यात नर्सिंगच्या अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या परिचारिकांची अधिकच वानवा जाणवत आहे.

एम.एस्सी. नर्सिंग ही पदवी घेणार्‍या परिचारिकांची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फार गरज असते. मात्र नर्सिंग व्यवसायाचा विचार करताना यात पदव्युत्तर पदवी मिळवणार्‍या नर्सेसचा कोणी विचारच करत नाही. नर्सिंगची बी.एस्सी. पदवी घेतल्यानंतर एम.एस्सी.च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन स्पेशलायझेशन करता येते. ते स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, पेडियाट्रीक नर्सिंग, सायकीयॅट्रीक नर्सिंग, ऑबस्टेट्रिक नर्सिंग अशा विषयांमध्ये केले जाते आणि त्या त्या खास रुग्णालयांमध्ये चांगल्या पगारावर असे स्पेशलायझेशन असलेल्या परिचारिकांची निवड तरी होते किंवा उपलब्ध परंतु स्पेशलायझेशन नसणार्‍या परिचारिकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून कामे करून घेण्याची जबाबदारी टाकली जाते.

हैदराबादच्या अपोलो कॉलेज ऑफ नर्सिंग या महाविद्यालयामध्ये नर्सिंगच्या एम.एस्सी. पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांमध्ये पाच-सहा प्रकारचे स्पेशलायझेशन करण्याची सोय तिथे आहे. इच्छुकांनी www.aherf.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा. त्याशिवाय आंध्रातील गुंटकल येथे श्री. पद्मावती ग्रुप ऑफ नर्सिंग इन्टिट्यूट या संस्थेतही या पदव्युत्तर पदवीची सोय आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बी.एस्सी. नर्सिंग ही प्रवेश पात्रता आहे.

www.padmavathiinstitutions.com या संकेत स्थळावर संपर्क साधावा. पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाचाही एम.एस्सी. पब्लिक हेल्थ असा नर्सिंगमधला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे. जीवशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे हा विषय घेऊन बी.एस्सी. झालेल्या उमेदवारांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल. हा अभ्यासक्रम नर्सिंगचा नसला तरी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा आहे. अशाच प्रकारचा अभ्यासक्रम पिलानी येथील (राजस्थान) बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत तसेच दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही उपलब्ध आहे.

Leave a Comment