बेनझीरच्या हत्येचे गूढ कायमच


पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या खुनाच्या खटल्यात दोघांना दोेषी ठरवण्यात आले असून माजी लष्कर प्रमुख तथा राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. पण ते विजनवासात असल्यामुळे त्यांची शिक्षा फर्मावली जाण्याची शक्यता कमी आहे. बेनझीर भुत्तो यांची हत्या ही वरिष्ठ स्तरावरच्या राजकीय विरोधकांकडून मोठ्या कौशल्याने करण्यात आली आहे पण न्यायालयाने केवळ दोघा पोलिसांना दोषी ठरवले आहे आणि या कटामागे कोण होते, त्यांनी हा कट कसा राबवला याचा काहीही उल्लेख केला नाही आणि त्याबाबत काही चौकशी करण्याची सूचनाही केली नाही. भारतात राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर असाच प्रकार घडला होता.

त्यांच्यावरच्या हल्ल्यामागचे खरे सूत्रधार कोण होतेे याची फारशी चौकशी न करताच ती थांबवण्यातही आली. राजीव गांधी यांची हत्या करण्यामागे लिट्टे संघटनेचा हात होता असा निष्कर्ष काढून तीही चौकशी थांबवण्यात आली होती. प्रत्यक्षात हा फार मोठा कट होता असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र तो कट कोणाचा आणि तो कसा राबवला गेला यावर प्रकाश पडलाच नाही. बेनझीर भुट्टोनाही संपवण्यामागे फार मोठा कट असावा असा अंदाज आहे आणि तो अल कायदा किंवा तालीबान संघटना यांच्यापैकी कोणीतरी राबविला असण्याची शक्यता अनेकांंना वाटते. कारण जेव्हा बेनझिर भुत्तो यांची हत्या झाली तेव्हा अनेक स्फोट झाले त्यात २४ जण मारले गेले होते. हा प्रकार एवढा मोठा होता की त्यात अनेकांचा समावेश असलाच पाहिजे असे वाटते.

या प्रकरणात मुशर्रफ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असला तरीही तो प्रत्यक्षातल्या खुनाच्या घटनेत हात असल्याबद्दल नाही तर बेनझिर भुत्तो यांच्या सुरक्षेत जाणून बुजून कमतरता ठेवल्याबद्दल आहे. राजीव गांधी याच्या बाबतीतही असेच घडले. त्यांची हत्या झाली तेव्हा सरकारने झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असलेल्या या नेत्याला एकही सशस्त्र पोलीस दिलेला नव्हता. एक मोठा पोलीस अधिकारी हातात काठी घेऊन तैनात होता तर एक महिला पोलीस कॉन्स्टेबल नेमण्यात आली होती. बेनझीर भुत्तो यांचे वडील झुल्फीकार अली भुत्तो यांना बनावट खून खटल्यात फाशीची शिक्षा देण्यात आली. हे सारी चार भावंडे लंडनमध्ये रहायला गेली. तिथे एक भाऊ व्यसनाधीन होऊन गूढरित्या मरण पावला तर दुसरा भाऊही असाच राजकीय वादातून मारला गेला. बेनझीर भुत्तो यांचाही काटा काढण्यात आला.

Leave a Comment