पाण्यामध्ये गाडी बंद पडल्यास घ्या ही खबरदारी


गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत झालेल्या प्रचंड पावसाने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. ट्रेन्स, बसेस, वीज इत्यादी सर्व यंत्रणाही कोलमडून पडल्या. अव्याहत कोसळणाऱ्या पावसामुळे कित्येक लोकांना ऑफिसेसमध्ये अडकून पडावे लागले, तर काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांनी अक्षरशः मिळेल तिथे आसरा घेतला. घराबाहेर असणाऱ्यांची चिंता, त्यांच्याशी न होऊ शकलेला संपर्क, पाण्याने दुथडी भरून वाहणारे रस्ते, रेल्वे ट्रॅक्स, आणि क्षणभराचीही विश्रांती न घेणारा पाऊस, या सगळ्याच गोष्टींमुळे सर्वांचेच हाल झाले. जे लोक आपापल्या चारचाकी वाहनांनी प्रवास करीत होते किंवा टॅक्सीने प्रवास करीत होते, त्या अनेक गाड्या रस्त्यावरचे पाणी शिरून बंद पडल्याच्या घटनाही पाहायला मिळत होत्या. अशी परिस्थिती जर आपल्यासमोर उद्भवलीच तर आपण काय करायचे याबद्दल विचार करणे अगत्याचे आहे.

सर्वप्रथम पावसाचे पाणी साठले असताना गाडी घेऊन निघण्याची वेळ आलीच तर आपल्याला जिथे जायचे आहे तिथे पोहोचण्याचे पर्यायी मार्ग कोणकोणते आहेत याचा विचार करावा. गाडी पाण्यातून चालवत असताना पहिल्या गियर मध्ये, अक्सिलरेटर कमी जास्त करत चालवावी. गाडी वेगाने चालवायचा मोह आवरायला हवा. जर रस्त्यावर गाडीच्या चाकांच्या उंचीच्या वर पाणी असेल तर मुळातच घराबाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर पडायचे की नाही आणि तशी खरोखरच गरज आहे का ते ठरवावे. जर बाहेर पडणे अनिवार्य असेल तर रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या इतर गाड्या बघून पाणी कितपत साठले असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करावा. जर पाण्यातून गाडी चालवायची वेळ आलीच तर पाण्याचे स्तर गाडीच्या एअरव्हेंटच्या वर नसल्याची खात्री करून घ्यावी. जर पाणी एअरव्हेंट च्या वर पोहोचत असेल तर ते गाडीच्या इंजिनमध्ये शिरण्याची शक्यता असते. जर पाणी इंजिनमध्ये शिरले असल्याची शंका असेल, तर गाडी ताबडतोब बंद करावी.

जर खूप जास्त पाणी साठलेल्या भागांमध्ये गाडी बंद पडली तर, सर्वप्रथम गाडीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. जर गाडीचा दरवाजा उघडत नसेल तर दोन्ही पायांनी जोर देऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करावा. गाडीच्या एअरव्हेंटच्या वर पाणी असेल तर तो एअरव्हेंट ब्लॉक होऊन गाडीमधील माणसाला गुदमरल्यासारखे होऊ शकते, अश्या वेळी त्या व्यक्तीने ताबडतोब गाडीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा. पाण्याच्या प्रवाहाला गती असल्यास ही गाडीचे दरवाजे उघडण्यास त्रास होऊ शकतो. अश्या वेळी दोन्ही पायांनी जोर देऊन गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करावा. कधी कधी एकाच ठिकाणी खूप वेळ अडकून पडल्याने गाडीची बॅटरी संपुष्टात आल्याने गाडीची लॉकिंग सिस्टीम फेल होण्याची शक्यता असते. अश्या वेळी जास्त वाट न पाहता गाडीच्या सीटमागील हेड रेस्टच्या सहाय्याने गाडीच्या खिडकीची काच तोडण्याचा प्रयत्न करावा. खिडकीची काच तोडल्यानंतर बाहेर हात काढन गाडीचे दार उघडावे. गाडीचा विंडस्क्रीन तोडण्याचा प्रयत्न करू नये कारण विंडस्क्रीन ‘ री – एनफोर्सड ‘ ग्लासने बनविला गेला असल्याने तो सहजी तुटत नाही.

Leave a Comment