बोगस बातम्या फेसबुकवर शेअर केल्यास होणार नुकसान !


सेन्ट फ्रान्सिस्को : बोगस आणि खोट्या बातम्या, माहिती सोशल मीडियामध्ये अग्रेसर असलेल्या फेसबुकवर आजकाल सर्रास शेअर केल्या जातात. फेसबुकने याला आळा घालण्यासाठी या बोगस बातम्या आणि माहिती शेअर करणाऱ्या पेजला जाहिराती देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘टेकक्रंच’ या वेबसाईटने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अशाप्रकारच्या बातम्या किंवा माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विवादग्रस्त म्हणून मार्क करेल आणि ही माहिती ज्या पेजकडून शेअर केली जाईल त्यांना जाहिराती मिळणार नाहीत. बातम्यांची सत्यता पडताळून बघण्यासाठी ‘स्नोप्स’ आणि ‘एपी’ या वेबसाईटशी यासाठी फेसबुकने हातमिळवणी केली आहे.

अशा बोगस बातम्या अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेस शेअर झाल्यामुळे फेसबुकला अनेक टीकांना सामोरे जावे लागले होते. फेसबुकने हे पाऊल गेल्या वर्षीच्या अनुभवातून धडा घेत उचलले आहे. फेसबुकचे प्रॉडक्ट डायरेक्टर रॉब लीथर्न यांनी सांगितले की, यावर तीन प्रकारे फेसबुक उपाययोजना करत आहे. एकतर बोगस बातम्या शेअर करणाऱ्यांना जाहिरातीतून मिळणारा आर्थिक लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर या बातम्या पसरण्याचे प्रमाण आणि वेग यावर नियंत्रण आणण्यात येईल आणि अशाप्रकारच्या बोगस बातम्या समोर आल्यावर त्यासंबंधित व्यक्तीला सूचित करण्यात येईल.

Leave a Comment