राम रहीमची मालमत्ता


डेरा सच्चा सौदाचा माजी प्रमुख गुरमित राम रहीम सिंग याला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याच्या अनुयायांनी ठरवून आणि भाडोत्री गुंड जमा करून जो धुडगूस घातला त्यात ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले ते सारे नुकसान आणि ही आग शांत करण्यासाठी झालेला सरकारचा खर्च हा त्याच्या संस्थानकडून वसूल करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. चार राज्यांमध्ये हा गोंधळ झाला परंतु पंजाबच्या सरकारने मात्र नुकसानीची भरपाई करण्याचा हा मार्ग स्वीकारला आहे. त्या निमित्ताने बाबाची कोणती मालमत्ता जप्त करता येईल आणि तिच्यातून किती पैसा मिळू शकेल याचा अंदाज केला असता पंजाब सरकारच्या असे लक्षात आले की या बाबाची एकट्या पंजाबमधली मालमत्ता ५८ कोटी रुपयांची आहे. ती कशी जप्त करायची आणि त्यातून भरपाई कशी करून घ्यायची यावर आता विचार सुरू आहे.

त्या दृष्टीने पंजाब सरकारच्या हालचाली वेगात सुरू असून जनतेकडून नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. आधी सरकारचा खर्च किती झाला याचे आकडे समोर आले आहेत. या हिंसाचारामध्ये पंजाबच्या दहा जिल्ह्यात अति सावधानतेचा इशारा देण्यात आला होता आणि त्या जिल्ह्यांमध्ये पोलिसांना सतत गस्त घालावी लागली. त्यामुळे सरकारचा ६० लाख रुपयांचा पेट्रोलचा खर्च झाला आहे. तो आता या डेर्‍याची जमीन लिलाव करून वसूल केला जाणार आहे. पंजाबमध्ये बरेच लोक धुडगूस घालून गेले. त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. त्यासाठी ६०० मालमोटारी वापरण्यात आल्या. त्या ६०० मालामोटारींचा खर्च राम रहीम बाबाच्या मालमत्तेचा लिलाव करून वसूल केला जाणार आहे.

बर्‍याच लोकांच्या मालमत्तेची हानी झाली. ९ जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला. त्यातील काहींची दुकाने जाळण्यात आली तर काहींच्या वाहनांना आगी लावण्यात आल्या. असे नुकसान झालेल्या सर्वांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देणारे फॉर्म वाटप करण्यात आले असून ते फॉर्म भरून आल्यानंतर नुकसानीचा आकडा कळणार आहे. पंजाबचे मोगा, संगरूर, बर्नाला, मोहाली, भटिंडा, मनसा, फिरोजपूर, फाजिलका, मुख्तसर या जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची हानी झालेली आहे. मोगा आणि बागपुराना तसेच अबोहर या शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. तिचेही नुकसान मोजले जाणार आहे.

Leave a Comment