आता रामपाल बाबाची चर्चा


आपल्या देशामध्ये धर्माच्या नावावर अनाचार माजवणार्‍या बाबांची काही कमतरता नाही या संबंधात अलीकडच्या काळात आसाराम बापू आणि डेरा सच्चा सौदाचा राम रहीम सिंग यांची नावे तर प्रचंड गाजलेली आहेत. राम रहीम सिंग नंतर सर्वोच्च न्यायालयाने आता आसाराम बापूची केस हाती घेतली असून आसारामच्या विरोधातील खटल्याची सुनावणी वेगाने का होत नाही असा सवाल केला आहे. त्यामुळे आसाराम बापूवरचा खटला वेगाने सुरू होऊन लवकरात लवकर त्यांना शिक्षा होण्याची शक्यता वाटायला लागली आहे आणि याच क्रमाने आता रामपाल बाबा याच्याही नावाची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र राम रहीम सिंग आणि आसाराम या दोघांचे गुन्हे ज्या प्रकारचे आहेत त्या प्रकारचा गुुन्हा रामपाल बाबांवर नाही.

आसाराम आणि राम रहीम हे दोन साधू कामातूर असल्यामुळे त्यांनी आपले बस्तान बसल्यानंतर अल्पवयीन मुली आणि आपल्या कह्यात आलेल्या साध्वी यांचे सातत्याने लैंगिक शोषण करण्यावरच भर दिलेला आहे. त्याचबरोबर हे दोन्ही बाबा स्वतःला साधू म्हणवत असले तरी जमिनी हडप करणे आणि मालमत्ता ताब्यात घेणे अशाही प्रकारात त्यांनी हात मारलेले आहेत. या गोष्टीसाठी त्यांनी हिंसाचारसुध्दा त्याज्य मानलेला नाही. परंतु रामपाल बाबाचे प्रकरण तसे नाही. त्यांनी कायद्याला बगल द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा आहे आणि गोंधळ घालणे, जमाव जमवून दंगल करणे असे गुन्हे त्याच्यावर असले तरी तो स्त्रियांचा लैंगिक छळ करण्याच्या प्रकरणात कधीही गुंतलेला आढळलेला नाही.

रामपाल बाबा हा हरियाणातलाच राहणारा आहे आणि धार्मिक मार्गावर येण्यापूर्वी तो इंजिनियर होता. त्याचा सतलोक नावाचा आश्रम असून तो स्वतःला कबीरपंथी समजतो. मूर्तीपूजा, मंदिरांचे प्रस्थ, अस्पृश्यता, धार्मिक कार्यक्रमात होणारी बिभत्स नृत्ये आणि व्यभिचार यांच्या विरुध्द त्याने सातत्याने जनजागृती केलेली आहे. बाबा राम रहीम किंवा आसाराम बापू यांच्या प्रमाणे त्याने कधीही मालमत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र जनजागृती करतानाच्या एका प्रवचनात त्याने आर्य समाजावर टीका केली. ती पसंत न पडलेल्या आर्य समाजींनी २००६ साली रामपाल यांच्या आश्रमावर हल्ला केला. त्या हल्ल्यात दोन पंथांमध्ये झालेल्या चकमकीत एक कार्यकर्ता मारला गेला आणि त्यामुळे रामपाल याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. साधूंनी असे करता कामा नये ही गोष्ट खरी पण रामपाल, आसाराम आणि राम रहीम यांच्यातील फरक लक्षात घेतला पाहिजे.

Leave a Comment