आर्थिक राजधानीची दैना


मराठवाडा आणि विदर्भाच्या मोठ्या भागात गेल्या आठवड्यातल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अजून मोठ्या पावसाची आवश्यकता आहे, असे असताना मुंबईत मात्र शहराचे जनजीवन उद्ध्वस्त करून टाकणारा पाऊस कोसळला असून २००५ साली झालेल्या ढगफुटीने उडालेल्या त्रेधेची आठवण लोकांना होत आहे. अर्थात कालचा मुंबईतला पाऊस हा २००५ सालच्या ढगफुटीसारखा नव्हता. तेव्हा ढगफुटी होऊन एका तासातच १०० इंचापेक्षा अधिक पाऊस झाला होता आणि शहरात एवढे पाणी साचले होते की अनेक इमारती पाण्यात बुडून गेल्या आणि सखल भागातील इमारतींच्या चौथ्या, पाचव्या मजल्यापर्यंत पाणी चढले. नंतर ते पाणी निघून जायला बरेच दिवस लागले आणि मुंबईकरांनी ३-४ दिवस पाण्यातच काढले. चोहीकडे पाणीच पाणी पसरले असूनही मुंबईकरांना प्यायला पाणी मिळाले नाही आणि ज्यांनी कोणी अस्वच्छ पाणी पिले त्यांना नंतर काही रोगांनी गाठले. अशा त्या अभूतपूर्व घटनेची आठवण व्हावी असा पाऊस काल मुंंबईत झाला. मात्र केवळ आठवण व्हावी असाच. तेवढा मात्र नव्हे.

सांताक्रूझच्या वेधशाळेमध्ये मंगळवारी ८.३० ते रात्री ८.३० या बारा तासात १३ इंच पावसाची नोंद झाली. हासुध्दा पाऊस भरपूरच म्हणावा लागेल. त्यामुळे मुंबई जलमय झाली. बसगाड्या बंद पडल्या. ज्या भागामध्ये कधी घोट्याएवढे पाणी साचत नाही त्या भागात छातीएवढे पाणी साचले आणि लोकांना तेवढ्या पाण्यातून मार्ग काढत घरे गाठावी लागली. अचानकपणे मंगळवारीच दिवसभरात या सार्‍या घटना घडल्या. बघता बघता महत्त्वाच्या ४० ते ५० ठिकाणी पाणी तुंबून वाहतूक बंद झाली. पावसाची काही चिन्हे दिसत नसतानाही किंवा बारिक पाऊस सुरू असल्यामुळे बिनधोकपणे कामाला गेलेले चाकरमाने लोक दुपारीच कार्यालयामध्ये आणि रस्त्यात अडकून पडले. दिवसभरात असा बेफाम पाऊस पडणार आहे याची कल्पना असती आणि आपण परत येताना अडकून पडणार आहोत याचा अंदाज असता तर यातल्या बर्‍याच मंडळींनी कामावर जायचे टाळले असते पण तसा काही अंदाज नव्हता. त्यामुळे तर चाकरमाने लोक आणि शाळा, महाविद्यालयातले विद्यार्थी यांची पावसाने कोंडी झाल्यागत झाली. देशाची आर्थिक राजधानी म्हणवणारे हे शहर एवढ्या पावसाने असे धोकादायक बनू शकते ही वस्तूस्थिती मनाला अस्वस्थ करणारी आहे.

२६ जुलै २००५ चा पाऊस मोठाच धोकादायक होता आणि त्यामुळे मुुंबईची स्थिती बिघडली असेल तर त्या विषयी निसर्गाशिवाय कोणालाच दोष देता येणार नाही. पण कालचा पाऊस तसा नव्हता. त्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असेल तर तो निसर्गाचा दोष नसून प्रशासनाचा दोष आहे. हे निखालसपणे सांगितलेच पाहिजे. मुंबईसारखीच अवस्था बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई याही शहरांची झालेली आहे. थोड्याबहुत पावसाने या शहराचे जनजीवन बघता बघता विस्कळीत होऊन जाते. यावर सध्या खूप चर्चा सुरू आहे. परंतु चर्चेतून निश्‍चित स्वरूपाचा मार्ग सापडत नाही आणि चर्चा म्हणजे केवळ एकमेकांना दोष देण्याचा खेळ ठरतो. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना या निमित्ताने शिवसेनेला ठोकून काढण्याची चांगलीच संधी मिळते. कारण गेल्या २० वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या हाती सत्ता आहे. २० वर्षांपासून मुंबई शहराची सूत्रे आपल्या हातात नाहीत याची कॉंग्रेसवाल्यांना खंत असल्यामुळे ते असे निमित्त मिळताच शिवसेनेवर टीकेची झोड उठवतात. भारतीय जनता पार्टीलाही अशी अंशतः संधी मिळते. कारण म्हटले तर मुंबईत भाजपची सत्ता आहे आणि म्हटले तर नाही, अशी अवस्था आहे.

पावसाने असे हाल का होतात याचे पहिले कारण म्हणजे गटारींची सफाई नीट न होणे. केवळ मुंबईच नाही तर इतर अनेक शहरांमध्ये उन्हाळ्यात गटारींची सफाई जेवढ्या खोलवर जाऊन करण्याची गरज असते तेवढ्या खोलवर होत नाही. परिणामी, गटारी उथळ होतात आणि त्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होत नाही. म्हणून गटारींची सफाई अगदी युध्दपातळीवरून बुडापर्यंत केली गेली पाहिजे. पाणी तुंबण्याच्या प्रश्‍नावर अनेक प्रकारच्या तांत्रिक चर्चा होतील आणि होतही आहेत. परंतु मुळात पाणी निघून जाण्याची गरज असते. हे कोणी नाकारू शकत नाही. गटारी जर उथळ होत आहेत तर पूर्वी असे प्रश्‍न का येत नव्हते असा प्रश्‍न कोणाच्याही मनात येऊ शकेल परंतु पूर्वीच्या काळी प्लॅस्टिकचा वापर म्हणावा तसा होत नव्हता. परंतु आता प्रत्येक छोट्या मोठ्या खरेदीला प्लॅस्टिकची पिशवी अपरिहार्य झाली आहे. एखादी वस्तू खरेदी केली जाते तेव्हा ती मुळात प्लॅस्टिकच्या आवरणातच पॅक केलेली असते. परंतु पॅक केलेली ही वस्तू ग्राहकाच्या हाती देताना ती परत एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून दिली जाते. अशा प्रकारे प्लॅस्टिक प्रचंड प्रमाणावर वापरले जाते आणि ते नंतर फेकले जाते. ते विघटित होत नाही आिण कुजतही नाही. गटारी तुंबण्यास मात्र कारणीभूत ठरते. अशा प्लॅस्टिकचा पूर्ण निचरा केला तर काल मुंबईवर कोसळलेले जलसंकट एक तर कोसळणार नाही आणि कोसळले तरी याचा एवढा त्रास होणार नाही.

Leave a Comment