आता तुरुंगात डेरा


डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमितसिंह राम रहीम सिंग याला काल सीबीआय न्यायालयाने २० वर्षांची सश्रम कारावासाची सजा सुनावली. आता त्याचे तुरुंगात कसे काय चालले आहे याविषयी लोकांना फार उत्सुकता आहे. कारण तुम्ही बाहेर कितीही श्रीमंत असला की एकदा शिक्षा झाली की तुम्हाला सर्व कैद्याप्रमाणे रहावे लागते. सश्रम कारावास झालेल्यांना रोज मेहनत करावी लागते आणि त्या बदल्यात त्यांना मजुरी मिळते. ती त्यांच्या खात्यावर जमा होते. राम रहीम बाबाला आता मजुरी करावी लागत आहे आणि त्याबदल्यात ४० रुपये रोजगार मिळणार आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी बाबा काय खात होता हे काही सांगायची गरज नाही. परंतु आता तुरुंगात त्याच्या घशाखाली घास उतरत नाही.

या बाबाचा निकाल लागला आणि त्याला गुन्हेगार ठरवण्यात आले तेव्हा मोठा हिंसेचा आगडोंब उसळला. पण त्याला शिक्षा सुनावली त्या दिवशी एकही अनुचित प्रकार घडला नाही. याचा अर्थ निकाल लागण्याच्या दिवशी पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवला नव्हता असाही होता. परंतु यात बाबाचे काही डावपेचही दिसतात. ज्या दिवशी निकाल सुनावला गेला त्या दिवशी दंगली घडवून न्यायालयावर दबाव आणण्याचा बाबाचा प्रयत्न असावा असा दबाव आला म्हणजे न्यायालय फारशी कठोर शिक्षा सुनावणार नाही असे त्याला वाटत असावे. असो परंतु बाबाला शेवटी आता न्यायापुढे गुडघे टेकावे लागले आहेत.

आता एकदा दोषी ठरल्यानंतर शिक्षा होणारच असे दिसायला लागताच आरोपी बाबाच्या वकिलाने त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी अशी मागणी केली. आपले अशील कसे लोकांना मदत करतात आणि ते कसे समाजोपयोगी कामे करतात याचा पाढा या वकिलाने वाचला आणि त्यांना सहानुभूती दाखवून सौम्य शिक्षा द्यावी अशी मागणी केली. उलट सरकारी वकिलाने बाबाला जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. अर्थात न्यायालयावर या दोन टोकांच्या मागणीचा काही परिणाम झाला नाही. न्यायालयाने न्यायनिष्ठुरपणे कायदा जे काही सांगतो त्याप्रमाणे वीस वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली आणि न्याय केला. मोठे ऐष आराम करणारा हा लंपट बाबा दोन दिवसांपासून कैद्याचे जीवन कसे असते याचा अनुभव घेत होता. आपण कितीही देवाचे लाडके आणि प्रेमींचे आदरस्थान असलो तरीही तुरुंगात त्याची काही पत्रास ठेवली जात नाही.

त्यामुळे दोन दिवस त्याला जसे रहावे लागले तसे आता आपल्याला वीस वर्षे रहायचे आहे याची एका क्षणात त्याला कल्पना आली आणि तो भर कोर्टात रडायला लागला. त्याने आजवर कितीतरी भोळ्या भाबड्या आणि निष्पाप लोकांना रडवले आहे. पण दु:ख झाल्यावर काय यातना होत असतात याची त्याला काही कल्पना नव्हती ती आज आली आणि हा लाखो लोकांचा लाडका साधू रडायला लागला. आपल्या प्रिय कन्येला आपल्या सोबत तुरूंगात रहायची परवानगी द्यावी अशी एक जगावेगळी मागणीही त्याने केली पण अर्थातच ती अमान्य झाली. असो आता एक अध्याय संपला असला तरीही न्यायाच्या भाषेत एक पायरी संपली आहे. बाबाजवळ गडगंज पैसा आहे. त्याचा वापर करून तो उच्च न्यायालयात आणि तिथेही मनाप्रमाणे न्याय मिळाला नाही तर सर्वोच्च न्यायालयातही जाणार आहे.

Leave a Comment