हा कलंक कधी संपणार?


महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या चांगल्या कामात भारतातल्या डोक्यावरून मैला नेणार्‍या सफाई कामगारांचे दुःख उजागर केले हे एक मोठे काम आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले तेव्हा ते कॉंग्रेसच्या अधिवेशनात सहभागी व्हायला लागले आणि अधिवेशनस्थळी प्रतिनिधींच्या शौचालयाची सोय काय आहे याची चौकशी करायला लागले. तेव्हा अनेकांना आश्‍चर्य वाटले. शौचालयाची सोय आणि त्यांच्या विष्ठेची विल्हेवाट हा काही विचार करायचा प्रश्‍न आहे असे त्याकाळी कोणी मानतच नसे. परंतु गांधीजींनी मात्र त्या विचाराला मोठी चालना दिली आणि ज्या लोकांना इतरांची विष्ठा डोक्यावरून वाहून न्यावी लागते त्यांना या घाण कामातून मुक्त केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

महात्माजींमुळे आज आपल्या देशात निदान या समस्येवर चर्चा तरी होत आहे. परंतु अजूनही काही लाख लोक हे गलिच्छ काम करत आहेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये अजूनही उघड्यावर शौचाला जाण्याची पध्दत आहे. पण तिथे कोणी मैला साफ करत नाही. लहान शहरे मोठ्या शहरातील बकाल वस्त्यांमध्ये मात्र हा प्रश्‍न आहे. तिथे अनेक महिला आणि लहान मुलेसुध्दा या कामात गुंतलेली आहेत. या विषयाला वाचा फोडण्यासाठी दिव्या भारती नावाच्या कार्यकर्तीने एक लघूपट तयार केलेला आहे. तामिळनाडूत राहणारी दिव्या भारती ही कम्युनिष्ट कार्यकर्ती असून तिने आपल्या लघूपटाला कक्कूस असे शीर्षक दिले आहे. कारण तामिळनाडूत मैला वाहून नेणार्‍या कामगारांना कक्कूस असे संबोधले जाते.

दिव्या भारतीने एका मोठ्या प्रश्‍नाला वाचा फोडली खरी परंतु आजही आपल्या समाजामध्ये केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणारे लोक आहेत. मैला साफ करणारे कामगार त्यांच्या या गलिच्छ व्यवसायातून मुक्त झाले तर मग हे काम कोण करणार असा प्रश्‍न त्यांना पडतो आणि या लोकांनी हे काम केलेच पाहिजे अशी त्यांच्यावर सक्ती करावी असा विचार ते बोलून दाखवतात. म्हणूनच दिव्या भारतीने या प्रश्‍नाला वाचा फोडताच काही लोक तिच्याविरुध्द चवताळले आहेत आणि त्यांनी दिव्या भारतीवर बनावट पोलीस फिर्यादी दाखल करून तिला अटक करायला लावली आहे. तिचा शक्य असेल त्या पध्दतीने छळ करून तिला या समस्येला वाचा फोडण्यापासून परावृत्त करण्यासाठी तामिळनाडूतले काही उच्चवर्णीय लोक धडपडत आहेत.

Leave a Comment