कामासक्त बाबा


गुरमित राम रहीम सिंग याला नेमकी काय शिक्षा होणार याचा निर्णय सोमवारी होणार आहे. परंतु त्याच्या आता उघड झालेल्या दोन बलात्कार प्रकरणातून जी माहिती पुढे येत आहे तिच्यानुसार या ढोंगी बाबाला फाशीची शिक्षा झाली तरी ती कमीच ठरेल इतके अपराध त्याने धर्माच्या नावावर केलेले आहेत. एखाद्या साध्वीवर बलात्कार करणे हा प्रकार आपल्याला गंभीर वाटत असला तरी बाबा राम रहीमच्या कथित धर्माचरणातला तो नित्याचा भाग होता. बाबा राम रहीमला जे अनुयायी लाभले होते. ते इतके भोळे आणि अज्ञानी होते की त्यांना आपण बाबाच्या आहारी जाऊन किती मोठ्या पापाचे धनी होत आहोत याचे भान नव्हते. बाबाच्या मठात येऊन बाबाला शरण येणारा माणूस हा बाबाच्या इच्छेनुसार वागण्यास बांधलेला असे. खरे तर बाबा त्यांच्यावर सक्ती करत असे ही गोष्ट खरी पण कित्येक लोक स्वतःहून आपल्याला बाबाच्या पायाशी घालत असत. अशा शरणागत म्हणजेच तनमनाने समर्पित झालेल्या कुटुंबातील एखाद्या सुंदर मुलीवर बाबाची नजर पडली की तिचे आयुष्य उद्ध्वस्त होत असे.

बाबा अशा तरुणीवर सतत लैंगिक अत्याचार करत असत आणि त्यांच्या सान्निध्यातल्या लोकांना हे गुपित माहीत असे. एका बलात्काराला ही सारी अनुयायी मंडळी शिक्षा म्हणत असत. ज्या अर्थी बाबांना त्या विशिष्ट तरुणीला अशी शिक्षा करण्याची सद्बुध्दी सुचली आहे त्याअर्थी तिने तसे काहीतरी पाप केले असणारच, असा या अनुयायांचा भोळा भाव असे. त्यामुळे लैंगिक अत्याचाराविषयी तक्रार करण्याचा काही प्रश्‍नच नसे. याउपरही एखाद्या तरुणीच्या कुटुंबीयांना काही आक्षेपार्ह वाटलेच आणि त्यांनी काही हरकत घेतलीच तर बाबाचे भोळे शिष्य त्याचा खून करत असत. बाबाच्या लैंगिक स्वैराचाराच्या आड येणार्‍या अशा कित्येक तरुणांचे मुडदे पाडले गेले आहेत. परंतु बाबांच्या प्रभावाखाली खुनाचे ते सारे प्रकार दडपले गेले आहेत. सध्या बाबाला ज्या प्रकरणात शिक्षा झालेली आहे त्या प्रकरणातल्या साध्वीच्या भावाचासुध्दा खूनच झालेला आहे आणि गेली १५ वर्षे हरियाणामध्ये बाबांचा असा नंगानाच राजरोसपणे सुरू आहे. हे सारे प्रकरण बघून अस्वस्थ झालेल्या काही पत्रकारांनी बाबांचा भांडाफोड करायचे ठरवले परंतु बाबांच्या हस्तकांनी एका पत्रकाराचा खून केला. अशारितीने बाबांच्या रेकॉर्डवर एका पत्रकारासह अनेक खून आणि नित्याचे लैंगिक अत्याचार नोंदले गेलेले आहेत. त्यामुळे या बाबाला फाशीची शिक्षा झाली तरी ती कमीच ठरेल, असे आज हरियाणामध्ये उघड बोलले जात आहे.

बाबांचा आश्रम म्हणजे एक प्रकारची गुफाच होती आणि आत प्रवेश केल्यानंतर आत येणार्‍या व्यक्तीवर त्या गुहेतल्या वातावरणाचा प्रचंड दबाव येत असे. बाबाची स्वतःची सशस्त्र फौज होती आणि या फौजेतले जवान हातात बंदुका घेऊन तिथे संरक्षणासाठी तैनात केलेले असत. आश्रमात सगळीकडे ब्लॅक कॅट कमांडोचा वावर होता. त्यातच सरकारने त्यांना झेड दर्जाचे संरक्षण दिलेले होते. वातावरणातल्या दहशतीमुळे या झेड दर्जाच्या संरक्षण व्यवस्थेचाही मोठा भाग असे. त्याशिवाय आश्रमात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असत आणि एखादा अभ्यागत पाहुणा किंवा बाबांचा अनुयायी नेमका काय हालचाली करतो याची मिनिटा मिनिटाची नोंद त्या कॅमेर्‍यामध्ये होत असे. बाबाच्या संरक्षण व्यवस्थेतील काही जवान वॉकीटॉकी घेऊन फिरत असत आणि त्यांचा परस्परांशी सातत्याने संपर्क असे. बाबाच्या दर्शनासाठी अनेक नेते येत असल्यामुळे त्या नेत्यांची फौज त्यांचे अनुयायी आणि त्यांची संरक्षण व्यवस्था अशा सार्‍यांचा वावर तिथे असल्यामुळे आणि सतत भारीभारी गाड्यांचा ताफा दिसत असल्यामुळे हा आश्रम नसून एखाद्या माफियांचा अड्डा आहे की काय असे वाटत असे.

आता बाबा राम रहीमला शिक्षा घडवणारा लैंगिक अत्याचार २००२ साली घडलेला आहे. म्हणजे बाबाच्या एका अत्याचाराला वाचा फुटायला १५ वर्षे लागली आहेत. याचा अर्थ बाबांची प्रचंड दहशत त्या भागात होती. ज्या साध्वीला आपल्या लैंगिक अत्याचाराला बाबाने फशी पाडले तिने आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाची हकीकत सांगणारे पत्र तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाठवले होते. ते पत्र सिरसा येथील एका वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. मात्र ते प्रसिध्द होण्याच्या दिवशीच बाबांचे दोन अनुयायी मोटारसायकलवरून संपादकाच्या घरी गेले आणि दिवसाढवळ्या त्या दोघांनी संपादकाचा खून केला. देशात अनेक गुंड राजकारणी आहेत आणि त्या पैकी काहींच्या नावावर पत्रकारांच्या खुनाचे खटले आहेत. लालूप्रसाद यादव यांचा लाडका मित्र शहाबुद्दीन याच्याही मागे एका पत्रकाराच्या खुनाचे प्रकरण आहे. परंतु याही प्रकरणात शहाबुद्दीनने एवढ्या निर्ढावलेपणाने पत्रकाराचा खून केलेला नाही. परंतु ज्या प्रकारचा खून करण्याची हिंमत एका निष्णात गुंडालासुध्दा होत नाही तशा प्रकारचा खून या बाबा राम रहीम नावाच्या भगव्या कपड्यातल्या गुंडाने करून दाखवला. अर्थात या खुनामुळेच प्रकरण अधिक वाढले आणि बाबाला आता शिक्षा होत अाहे. मात्र अजूनही आपल्या देशातले भोळेभाबडे भक्त अशा बाबांच्या नादी का लागतात हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो.

Leave a Comment