हे कसले साधू?


देशाता साधू खूप आहेत पण ते लोकांना साधना लावतात म्हणून साधू म्हणवले जात नाहीत तर ते संधीसाधू असल्यामुळे साधू म्हणवले जातात. अशा साधूंनी साधूंची व्याख्या कलंकित केली आहे आणि धर्मही भ्रष्ट केला आहे. हरियाणातील डेरा सच्चा सौदा या पंथाचे प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग हे अशा साधूंचे मुकुटमणीच शोभावेत. त्यांना विशेष सीबीआय न्यायालयाने १५ वर्षापूर्वी केलेल्या दोन महिलांवरील बलात्काराबद्दल दोषी ठरवण्यात आलेले आहे. त्यांना याबद्दल काय शिक्षा देणार याचा निर्णय येत्या सोमवारी होणार आहे. शक्यतो कमीत कमी सात वर्षांचा कारागृह किंवा न्यायाधीशांनी कडक भूमिका घेतली तर त्यांना जन्मठेपसुध्दा सुनावली जाऊ शकते. डेरा सच्चा सौदा या पंथाचे मुख्य ठिकाण हरियाणात सिरसा येथे आहे. परंतु गुरमित राम रहीम यांच्यावर झालेला खटला पंचकुला येथे चालवला गेला. या बाबाचे अनेक अनुयायी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये आहे. ते स्वतःला प्रेमी म्हणवून घेतात. हे लोक बाबा गुरमित यांच्यावर वेड्यासारखे प्रेम करतात.

हे सगळे भोळेभाबडे शिष्य बाबांना शिक्षा होणार हे ऐकून एवढे संतप्त झाले आहेत की ते कोणत्याही क्षणी प्रचंड दंगली घडवतील अशी शक्यता प्रशासनाला वाटते. म्हणून गेल्या दोन दिवसांपासून हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये सर्वत्र कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. या वेड्या प्रेमींपैकी तिघांचा तर आजच बाबा दोषी ठरवल्यामुळे मृत्यू झाला आहे. यापुढे काय घडेल आणि शिक्षा सुनावल्यानंतरची परिस्थिती काय असेल हे काही सांगता येत नाही. मात्र प्रशासनाला या निमित्ताने लोकांचा मोठा प्रक्षोभ होईल अशी शक्यता वाटते. उच्च न्यायालयाने तर याबाबतीत प्रशासनाला कडक सूचना दिल्या असून हिंसाचार करणार्‍या लोकांना सक्तीने निपटून काढण्याचा आदेश दिला आहे. बाबा दोषी ठरलेले हे प्रकरण १५ वर्षांपूर्वीचे आहे. २००२ साली त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता आणि दोन साध्वींवर बलात्कार केल्याचे त्यात म्हटले होते. ही माहितीसुध्दा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला आलेल्या एका निनावी पत्रावरून उघड झाली होती. पत्र मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाने बारकाईने चौकशी केली आणि आठ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाला या निनावी पत्रामध्ये तथ्य वाटले. कारण बाबांचा महिमा फार मोठा आहे. या बलात्काराच्यापूर्वी त्यांच्यावर दोन खुनाचे खटले दाखल आहेत.

२००२ साली निनावी पत्रे आली आणि त्यांचा प्रवास पुढे दीर्घकाळ चालू राहिला. कारण या पत्रामध्ये बाबावर १९९१ ते २००१ असे तीन वर्षे दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता आणि अशा प्रकरणात खटला चालवण्यासाठी प्रत्यक्ष अत्याचारित महिलांची जबानी आवश्यक असते. त्यामुळे सीबीआयने हे प्रकरण हाती घेतले आणि २००७ साली अंबाला येथील न्यायालयात बाबावर खटला दाखल केला. त्यानंतर वर्षभराने बाबावर भारतीय दंडविधान संहितेच्या ३७६ आणि ५०६ या दोन कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन पीडित महिलांनी आपले म्हणणे सादर केले. तेही न्यायालयात सादर केले. बरीच वर्षे खटला सुरूच झाला नाही. कारण बाबा गुरमीत राम रहीम यांचे राजकीय वजन फार मोठे आहे. त्यांना मानणार्‍या प्रेमींची संख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे आणि त्यात प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे हरियाणातल्या कोणत्याही निवडणुकीत बाबांचा आदेश निर्णायक मानला जातो. बाबा ज्या पक्षाच्या बाजूने उभे राहतील तोच पक्ष विजयी होऊ शकतो असे मानले जाते आणि तसे अनुभवही आहेत.

या वजनाचा परिणाम म्हणून असेल परंतु बरीच वर्षे खटला चालू राहिला नाही. शेवटी २०१७ च्या जुलै महिन्यात म्हणजेच नुकतेच या खटल्याची नित्य सुनावणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आणि त्यामुळे बाबाला शिक्षा होऊ शकली. या सगळ्या गोष्टी आपल्या लोकशाहीवर, मतांच्या राजकारणावर आणि लोकांच्या मनोवृत्तीवर मोठा प्रकाश टाकणार्‍या आहेत. आपण सर्वजण जाहीररित्या बोलताना न्यायालयाचा आदेश सर्वांनी मानला पाहिजे असे आपण म्हणतो परंतु बाबांच्या शिक्षेची सुनावणी होताना लोक प्रक्षुब्ध होऊन दंगली घडवू शकतात, याचा अर्थ आपण न्यायव्यवस्थेला मानत नाही असा होतो. या निमित्ताने बाबाचा आश्रम, त्यात वापरली जाणारी शस्त्रे, तिथे होणारे अवैध व्यवहार आणि बाबाची दहशत याही गोष्टी लोकांना समजलेल्या आहेत. बाबांच्यावर केवळ लैंगिक अत्याचाराचाच खटला आहे असे नाही तर इतरही अनेक खटले दाखल आहेत. म्हणजे बाबा धार्मिक वस्त्रांच्या आत गुन्हेगारी वर्तन करत होते. त्यांच्या आश्रमात धर्माच्या नावाखाली सुरू असलेले सगळे स्वैराचार हेसुध्दा धर्माला कलंक लावणारे होते. तिथली माहिती गोळा करण्यास जाणार्‍या पत्रकारांनासुध्दा अनेकवेळा वाईट वागणुकीला तोंड द्यावे लागले आहे. कोणत्याही धार्मिक पंथाचे प्रमुख हे जनतेला पैसा, संपत्ती, वैभव यापासून दूर राहण्याची शिकवण देत असतात. परंतु प्रत्यक्षात हे पंथ प्रमुखच वैभवात लोळत असतात आणि गुन्हेगारीत गुंतलेले असतात. गुरमित राम रहीम सिंग हे त्यांचेच एक उदाहरण आहे.

Leave a Comment