कठोर शासन हवेच


केरळातल्या गाजलेल्या वेरापुझा सेक्स रॅकेटमधील दोघा आरोपींना अर्नाकुलम येथील सत्र न्यायालयाने १८ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात ३४ जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यांचे जबाब घेऊन त्यातल्या आठ जणांवर खटला दाखल करण्यात आला होता. तीन राज्यांत घडलेल्या या चक्रावून टाकणार्‍या रॅकेटमध्ये एका अल्पवयीन मुुलीवर केरळा, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांत अनेक ठिकाणी अनेक दिवस अत्याचार करण्यात आले होते. ती सिद्धही झाले पण ३४ जणांना अटक होऊनही केवळ दहाच जणांवर खटला दाखल झाला आणि त्यातल्याही केवळ दोघांनाच शिक्षा झाली ही गोष्ट काहीशी अनाकलनीय वाटते.

अर्थात ज्या दोघांना शिक्षा झाल्या आहेत त्यांना कठोर आहेत. मुख्य आरोपी शोभा जॉन हिला १८ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली असून दुसरा आरोपी जयराज नायर याला ११ वर्षे कारावासाची शिक्षा झाली असून या शिवाय त्यांना एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. यातील जयराज नायर हा निवृत्त सेनाधिकारी आहे. पण तो निवृत्तीनंतर अशा प्रकारच्या व्यवसायात उतरला ही मोठीच दुर्दैवाची बाब आहे. तो आता ७० वर्षांचा आहे. यातली मुख्य आरोपी शोभा जॉन ही ४३ वर्षांची असून तिने या मुलीला तिच्या पालकांकडून एक लाख रुपयांना विकत घेतले होते. नंतर तिचा वापर करून तिला या तीन राज्यात अनेकांशी शय्यासोबत करायला लावली.

या प्रकरणात याच दोघांनी या मुलीला नवनव्या ग्राहकांकडे पाठवले असे सिद्ध झाले असून त्यामुळेच या दोघांना शिक्षा झाली आहे. या मुलीच्या आई वडिलांनी तिला या महिलेला विकले होते. पण अशी आपल्याच मुलीची विक्री का करावी लागते असा प्रश्‍न उभा रहातो. या विक्रीची तपशील समोर यायला हवे होते. शिवाय अशा दोघांनी तीन राज्यात या मुलीला फिरवले ते कोणाचीही मदत न घेता फिरवले यावर विश्‍वास बसत नाही. या प्रकरणात मुलीला विकणारे पालक, अशा विक्री व्यवसायात मध्यस्थी करणारे दलाल आणि तीन राज्यातल्या काही शहरांत या रॅकेटसाठी कराव्या लागणार्‍या व्यवस्था अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे रॅकेट फार मोठे असण्याची शक्यता दिसते. तेव्हा या प्रकरणात अनेकांचा हात असणार हे उघड आहे पण हे अनेक लोक करून सवरून निरपराध म्हणून सुटलेले दिसतात.

Leave a Comment