बाबा आणि देवींचा महिमा


डेरा सच्चा सौदा चे राम रहिम यांच्या शिक्षेमुळे या देशातल्या काही नामवंत बाबा आणि देवींच्या कारवाया आणि ढोंग धत्तुरे यांच्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडायला लागला आहे आणि त्यांची साम्राज्ये तसंच त्यांच्या कारवाया या लोकांना कळायला लागल्या आहेत. राधे मॉं हे एक असेच प्रकरण. राधे मां ने एका कुटुंंबातल्या सुनेला तिच्या छळायला तिच्या सासरच्या लोकांना प्रोत्साहन दिले असा तिच्यावर आरोप आहे. ती स्वत:ला दुर्गेचा अवतार मानते आणि तिचे अनुयायीही तिचा तसाच आदर करतात पण ती दुर्गेचा अवतार आहे हे कसे कळले याचा काही खुलासा केला जात नाही. या ढांेंगी बाबांचे हे एक वैशिष्ट्य असते.

आचार्य रजनीश हे आचार्य म्हणून ओळखले जात होते पण अचानक एके दिवशी त्यांचा उल्लेख भगवान असा केला जायला लागला. एका समाजसुधारकाने त्यांना या बदलामागचे कारण विचारले. आपल्याला आचार्यपदावरून भगवान पदावर मिळालेली बढती कशामुळे मिळाली आहे असा प्रश्‍न केला पण रजनीश त्याचा खुलासा करू शकले नाहीत. त्यांचे प्रस्थ माजवण्यासाठी असे करण्यात आले होते. पण पुढे त्यांच्या अनुयायांनी भगवान हे अभिधान कधी म्हणून वापरले नाही. मुळात यातले काही बाबा आणि साधू एखाद्या आश्रमाचे किंवा पंथाचे प्रमुख म्हणून निवडले जातात ते कशाच्या जोरावर हे कधीच कळत नाही. दुसर्‍या कोणाच्या तरी गादीवर येणारे असे बाबा स्वत:ही त्याचा कधी खुलासा करीत नाहीत.

विशेष म्हणजे अशा बाबांना अनुयायी मिळतात ते मात्र लाखात आणि त्यांची संपत्ती असते ती काही कोटींत. हरियाणात रामफळ बाबा नावाचे एक प्रस्थ असून त्यांचे केवळ हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानात २५ लाख अनुयायी आहेत. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले आसाराम यांचे अनुयायी तर काही कोटीत आहेत. त्यांच्या आश्रमांची संख्याही ४२५ असून ते अनेक देशांत पसरलेले आहेत.स्वामी नित्यानंद यांच्यावर तर तीन महिलांनी बलात्काराचे आरोप केले आहेत. मात्र ते मोठे विद्वान आहेत कारण त्यांची जवळपास तीनशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. एवढे विद्वान असूनही त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. आचार्य रजनीश यांनीही अनेक पुस्तके लिहिलेली आहेत पण त्यांच्यावरही अनेक आरोप आहेत. त्यांनी भारता बाहेरही अनेक आश्रम स्थापिलेले आहेत. याबाबत त्यांची बरोबरी केवळ सत्य साईबाबांशीच होऊ शकेल.

Leave a Comment