मोदींच्या मराठमोळ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा


आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आगमन होत असल्यामुळे गणेशोत्सवाचा मोठा उत्साह महाराष्ट्रासह देशभरात पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर खास मराठी भाषेतून देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण त्यांना आतापर्यंत देशातील अनेक महत्त्वाच्या सणांच्यावेळी देशवासियांना शुभेच्छा देताना पाहिले आहे. पण मोदींनी काल एका कार्यक्रमादरम्यान मराठी भाषेतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूश केले. त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना अचानकपणे मराठीत बोलायला सुरूवात केली. त्यांनी सुरूवातीला या कार्यक्रमातील पुरस्कार विजेत्यांचे मराठीतून अभिनंदन केले. त्यानंतर उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो, असे सांगत मोदींनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना दिवस कार्यक्रमात भाषण देत होते. यंदा या संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काल सायंकाळी पंतप्रधानांचे भाषण झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, साबरमती आश्रम निर्माण आणि चंपारण सत्यग्रहला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. तर सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला या तिन्ही बाबींनी वेगळी दिशा दिली आहे. त्यामुळे इतिहासात या तिन्ही घटनांना अनन्यसाधारण महत्व आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि महादेव जानकर हेदेखील उपस्थित होते.

Leave a Comment