मोबाईलची भन्नाट वाढ


भारतात दरडोई एक मोबाईल फोन असण्याचे चित्र काही फार दूर नाही. आताच देशात जवळपास ९५ कोटी मोबाईल फोन आहेत. १३४ कोटींच्या देशामध्ये ९५ कोटी मोबाईल ही स्थिती थक्क करणारी आहे. मोबाईल फोनची निर्मिती, विक्री, दुरूस्ती आणि सेवा या क्षेत्रामध्ये एवढी प्रचंड उलाढाल होत आहे की २०१७ सालच्या शेवटी ती ३७ अब्ज डॉलर्स एवढी होण्याची शक्यता आहे. या क्षेत्राची वाढ दरवर्षी १०.३ टक्क्यांनी होत असून २०२० साली ती १०३ अब्ज डॉलर्स एवढ्या टोकाला जाऊन पोहोचण्याचा अंदाज आहे. मोबाईलसह एकंदरीत सेवा उद्योगाची वाढ ७.४ टक्क्यांनी होत आहे. त्यात मोबाईलची वाढ स्वतंत्रपणे नोंदल्यास ती १० टक्के आढळत आहे. असोचेम या संघटनेने भारतातल्या सेवा क्षेत्राचा अभ्यास केला असता हे सेवा क्षेत्र गतीने वाढत असल्याचे दिसून आले आहे.

सध्या देशाच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नाचा २०.५ टक्के एवढा हिस्सा सेवा क्षेत्राने व्यापलेला असून त्याची उलाढाल ३०५ अब्ज डॉलर्स एवढी असल्याचे आढळले आहे. अर्थ व्यवस्थेच्या २० टक्के हिस्सा असणार्‍या या क्षेत्रात एकूण रोजगार निर्मितीच्या ४० टक्के एवढा रोजगार आहे. या रोजगाराची वाढ वर्षाला २९ टक्के एवढ्या गतीने होत आहे. परंतु या क्षेत्रात आणखी रोजगार निर्मिती होण्याची गरज आहे. कारण जेव्हा एखाद्या देशाीची अर्थव्यवस्था विकसित होते तेव्हा अधिकात अधिक रोजगार निर्मितीचा भार सेवा क्षेत्रावर पडत असतो. उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती कमी परंतु उत्पन्नवाढ चांगली असते. परंतु उत्पादन क्षेत्र विकसित झाले की त्यातूनच सेवा क्षेत्राची गरज निर्माण होते आणि सेवा क्षेत्र वाढते.

अमेरिकेत उत्पादन क्षेत्रात होणारी उलाढाल प्रचंड मोठी आहे. परंतु सेवा क्षेत्राची उलाढाल अर्थव्यवस्थेच्या ५५ं टक्के एवढी आहे. ही आदर्श स्थिती मानली जाते. भारतात मात्र ५५ टक्के उलाढाल व्हायला बराच काळ जावा लागणार आहे. भारतातली शेती या दृष्टीने अडचणीची ठरत आहे. कारण शेतीक्षेत्रात उलाढाल अतीशय कमी म्हणजे एकूण उलाढालीच्या १८ टक्के एवढीच आहे. परंतु तेवढ्या उलाढालीवर ६० टक्के रोजगार निर्मितीचा भार पडलेला आहे. तेव्हा शेतीक्षेत्रातून रोजगार बाहेर पडला पाहिजे आणि तिथे कमी रोजगारात जास्त उत्पादन झाले पाहिजे. तिथून बाहेर पडणारा रोजगार हा सेवा क्षेत्रात शोषून घेतला गेला पाहिजे. शेतीपेक्षा सेवा क्षेत्रात चांगला रोजगार मिळतो आणि त्यातून राहणीमान सुधारते. म्हणून भारताच्या मोबाईल क्षेत्रात अधिक वाढ होण्याची गरज आहे.

Leave a Comment