बिहारमधील जलसंकट


ट्रिपल तलाक, बिहारमधील नवी राजकीय मांडणी, प्रायव्हसी आणि अन्य अनेक राजकीय, सामाजिक विषयांनी देशाचे जीवन ढवळून निघाले असले तरी लाखो लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम करणार्‍या एक नैसर्गिक आपत्तीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झालेले आहे. परंतु ही नैसर्गिक आपत्ती महाविनाशकारी आणि अभूतपूर्व स्वरूपाची आहे. बिहारमध्ये हे जलसंकट अक्षरशः प्रलय व्हावा अशा पध्दतीने कोसळलेले आहे. बिहारमध्ये नेहमीच पूर येतात आणि बिहारच्या उत्तर भागात तसेच मध्य भागात दरवर्षी पुराने मोठी हानी होते. म्हणून त्याकडे सर्वच जण नेहमीचाच प्रकार म्हणून दुर्लक्षित करतात. पण सध्या बिहार, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांना ग्रासून राहिलेल्या पूर परिस्थितीचे गांभीर्य सार्‍या देशाने लक्ष द्यावे असे आहे. आसाममध्ये नेहमीच पूर येतात. परंतु या वर्षी एकाच पावसाळ्यात आसामला तीन वेळा पुराचा तडाखा बसलेला आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये एवढे गंभीर स्वरूपाचे पूरसंकट प्रथमच कोसळले असेल.

आसाममधून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आसामच्या ३२ पैकी २४ जिल्ह्यांमधील अनेक खेडी पाण्याखाली बुडलेली आहेत. राज्यातील २ हजार ९७० खेडी पूर्णपणे जलमय झालेली असून ३३ लाख लोकांचा संपर्क तुटलेला आहे. या लोकांना मदत छावण्यात आश्रय देता येतो परंतु त्यांना मदत छावण्यापर्यंत पोहोचवणेसुध्दा मुश्कील झाले आहे. २० तारखेपासून ही स्थिती थोडी सुधरायला सुरूवात झाली. परंतु वर्षातून ३ वेळा असा फटका बसल्यानंतर लोक किती उद्ध्वस्त होत असतील याचा अंदाजपण करता येणार नाही. आसामच्या पूर्व भागातील धेमजी हा जिल्हा तर पूर्णपणे पूरग्रस्त असून त्याचा जगाशी संपर्क तुटलेला आहे. या जिल्ह्यातील ४ लाख एकर जमिनीवर पिके पूर्ण वाहून गेलेली आहेत. बिहारमध्ये तर पुराचा एवढा कहर आहे की कित्येक अनुभवी लोक आपल्या आयुष्यात कधी पाहिला नाही असे सांगत आहेत. बिहारचे निम्मे जिल्हे पूरग्रस्त झालेले आहेत आणि एवढ्या जिल्ह्यामधील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पुरेना, नालंदा, पटना, किशनगंज, मधुबनी या जिल्ह्यातील ३ हजार ८०० खेडी जलमय झालेली आहेत. बिहारमधील पूरग्रस्त लोकांची संख्या ७३ लाख एवढी आहे. एवढ्या लोकांना आता परिस्थिती सामान्य होईपर्यंत मदत छावण्यात आश्रय द्यावा लागणार आहे आणि त्यांच्या जेवणाखाण्याची सोय करून द्यावी लागणार आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी तर अब्जावधी रुपये लागणार आहेत.

या जलापत्तीमुळे मरण पावणार्‍यांची संख्या शंभरांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हा आकडा अजून समजूही शकलेला नाही. विशेष म्हणजे बिहारच्या ज्या लोकांनी गेल्या १०० वर्षात पुराची आपत्ती कशी असते हे पाहिलेलेसुध्दा नाही आणि ज्यांच्या आयुष्यात कधीच पुराच्या संकटाला तोंड द्यावे लागलेले नाही. त्यांनासुध्दा यंदा पहिल्यांदाच पूर म्हणजे काय असतो हे बघावे लागले आहे. पश्‍चिम चंपारण्य जिल्ह्यात तर तीनवेळा पुराचा वेढा पडलेला आहे. मधुबनी, किशनगंंज, कटिहार, चपारण्य, सुपौल, आरारिया, सहारसा आणि माथेपुरा या जिल्ह्यात पुरांमुळे अक्षरशः बरबादी झालेली आहे. त्यामुळे तिथे मदतकार्य करण्यासाठी हवाईदलाची मदत घ्यावी लागली. २ लाख ८० हजार लोकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढावे लागले. ब्रह्मपुत्रा, धनसीरी, जियाभाराली, कुथीमारी, बेकीसंतोक, काटखल आणि कुशियारा अशा ७ नद्या एकाच वेळी प्रचंड भरून धो-धो वहाव्यात असा प्रकार प्रथमच घडला. त्यातली केवळ ब्रह्मपुत्रा नदी कोपली तरी हजारो लोकांचे हाल होतात पण इथे तर ब्रह्मपुत्रेसह ७ नद्या एकदम कोपल्या आहेत.

असे पुराचे संकट का यावे यावर आता विचार केला जात आहे. कारण तसा विचार केल्याशिवाय येणार्‍या काळात घडू पाहणारे असे जलापघात टाळता येतील. हवामान खात्यातील तज्ञांच्या मते हवामानाच्या बदलत्या पॅटर्नमुळे अशी तबाही होत आहे. सध्या पाऊस पडतो तो एकाच ठिकाणी पडतो आणि पडला तर प्रचंड पडतो. ज्या भागाला पाऊस तडाखा देतो त्याचा शेजारचा जिल्हा पूर्ण कोरडा असतो. असा हा पाऊस लहरी झालेला आहे. शिवाय नद्यांची पात्रे उथळ झाली आहेत. त्यांमध्ये प्रचंड गाळ साचलेला आहे. शिवाय पाऊस पडला तर भरपूर पडतो नाहीतर कडक ऊनच पडते आणि अशा उन्हामुळे नद्यांचे पाणी लवकर आटते. तसे आटले म्हणजे गाळ जास्त साचतो. त्याशिवाय सध्या पावसाचे पाणी जिरवून घेणारी जमीन शिल्लक राहिलेली नाही. कारण आपण जमीन वापरत चाललो आहोत. त्यावर बांधकामे करत आहोत. ज्या जागेवर बांधकाम होते त्या जागेतले पावसाचे पडलेले पाणी जवळपासच्या मोकळ्या भागात सोडून दिलेले असते आणि तेवढ्याच भागावर पावसाचे पाणी शोषून घेण्याची जबाबदारी पडते. ज्या जमिनीने पाणी शोषून घ्यायला हवे तिचे क्षेत्रफळ घटत आहे आणि त्यामुळे तेवढ्या जमिनीतले पाणी पटकन धोक्याची पातळी गाठत आहे. म्हणजे पाण्याचे हे भयानक संकट केवळ निसर्गानेच निर्माण केलेले आहे असे नाही. तर ते मानवनिर्मितसुध्दा आहे.

Leave a Comment