अभिनेत्यांची कमाई


फोर्बस नावाच्या नियतकालिकांत जगातल्या अनेक क्षेत्रातल्या थोर्थोर लोकांची क्रमवारी दिलेली असते. राजकारणात सध्या कोण टॉपला आहे, चित्रपट सृष्टीत नंबर एक कोण आहे आणि जगात सर्वात श्रीमंत कोण आहे याची छान माहिती या मासिकात आलेली असते. ती अधिकृत मानली जातेच पण तशी ती कोणाला सहजासहजी उपलब्ध होण्यातली नसते. कारण ती माहिती गोळा करणे हे मोठे जिकिरीचे असते. त्यासाठी अनेक माणसे कामाला लावावी लागतात आणि मूळ स्रोतापासून माहिती मिळवावी लागते. ते काम मोठेच कौशल्याचे असते. आता जगभरातल्या चित्रपट तारे आणि तारकांच्या कमायीच्या आकड्यांचेच घ्या. या तार्‍यांची कमायी किती असते ही माहिती गोळा करून त्यांची क्रमवारी लावायची तर किती माहिती गोळा करावी लागेल याचा अंदाज करा.

अशा कष्टाने फोर्बसने जगातल्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या मानधनाची माहिती गोळा केली आहे. जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक अभिनेता दडलेला असतो. आपण आयुष्यात कधी तरी मोठा नट होऊन बराच पैसा गोळा करायला हवा होता असे प्रत्येकाला वाटत असते. पण कितीही आणि काहीही वाटले तरी प्रत्येकजण हा काही अभिनेता बनू शकत नाही. म्हणून प्रत्येक जण अभिनेत्यांची जमेल तेवढी आणि विशेष करून कमायीची माहिती वाचून आपल्या मनाचे समाधान करून घेत असतो. जगातला सर्वात अधिक मानधन घेणारा अभिनेता मार्क वालबर्ग हा आहे. जगातल्या सर्वात अधिक कमायी करणार्‍या पहिल्या दहा अभिनेत्यांत भारतातल्या तिघांचा समावेश आहे हे आपल्या दृष्टीने विशेष आहे.

भारतात सर्वाधिक लोकप्रिय मानला जाणारा शाहरूख खान हा या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. सलमान खान नवव्या क्रमांकावर तर अक्षयकुमार हा दहाव्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेले तीन अभिनेते फोर्बसच्या यादीतल्या पहिल्या दहा कलावंतांत खालच्या नंबरावर आहेत. शाहरूखखानने गेल्या वर्षी २४५ कोटी ५० लाख रुपये कमावले आहेत. सलमान खानची या वर्षातली कमायी २३८ कोटी तर अक्षयकुमारची कमायी २२७ कोटी ५० लाख रुपये आहे. या यादीतल्या पहिल्या दहाच्या यादीत आमीरखान हा काही चमकलेला नाही. आपले तीन हीरो आठव्या आणि दहाव्या क्रमांकावर असले तरीही जगातल्या अनेक नामवंत अभिनेत्यांपेक्षा आघाडीवर आहेत. या यादीत अभिनेत्री नाहीत हे विशेष होय.

Leave a Comment