नैसर्गिक मृत्यु नाही, तर आत्महत्या?


मुंबईतील अंधेरी येथील बेल्स्कॉट टॉवर्स ह्या इमारतीत राहणाऱ्या श्रीमती आशा सहानी यांचे शव त्यांच्या नुकत्याच अमेरिकेहून परतलेल्या मुलाला, ऋतुराजला सापडल्याची धक्कादायक घटना आपण सर्वांनीच ववृत्तपत्रातून वाचली असेल. ऋतुराज अमेरिकेहून निघून मुंबईच्या विमानतळावर उतरला आणि आपल्या आईला भेटण्यासाठी अंधेरी येथील आपल्या घरी आला. अनेक वेळा दार वाजवूनही श्रीमती आशा सहानी यांनी दार उघडले नाही. त्यामुळे ऋतुराज याने किल्ली बनविणाऱ्याला बोलावून आणून, त्याच्याकडून किल्ली बनवून घेऊन घर उघडलेले असता, आपल्या आईचे शव त्याला बेडरूममध्ये दिसले. पोलिसांच्या तपासामध्ये, श्रीमती आशा यांचा मृत्यू अनेक महिन्यांपूर्वी झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर वर्तमानपत्रांमधून या बातमीला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. लोकांनी ऋतुराज एक बेजबाबदार मुलगा असल्याचे म्हटले, कारण आपल्या आईला भेटण्यासाठी ऋतुराज वरचेवर येत नसे. पण आता तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी नवीन माहिती समोर येत आहे. श्रीमती आशा यांचा मृत्यू नैसर्गिक नसून आत्महत्या असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऋतुराज हा एक अतिशय गुणी मुलगा असल्याचे त्याचे शेजारी सांगतात. अमेरिकेमध्ये ऋतुराज एका आय टी कंपनीमध्ये काम करतो. काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले आणि नंतर मुलगाही झाला. पण बायकोशी पटेनासे झाल्यामुले ऋतुराजने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर त्याचा लहान मुलगा त्याचाच जवळ राहत असल्याकारणाने ऋतुराजला वरचेवर मुलाला सोडून येणे शक्य नव्हते. गेल्या वर्षीदेखील ऋतुराज आपल्या आईला भेटण्यासाठी आला होता पण आशा यांनी दार न उघडल्याने त्याला परतावे लागले होते.

श्रीमती आशा यांची मनस्थिती, त्यांच्या पतीचे निधन झाल्यापासून ठीक नसे. त्या विशेष कोणाशी बोलतही नसत. आपल्या संपत्तीवर सगळ्यांचा डोळा आहे अशी त्यांची समजूत झाली होती. या कारणाने त्यांचे ऋतुराजशी ही वाद होत असत. आपल्याला कोणीतरी लुबाडेल या भीतीने त्या कोणालाही घरात येऊ देत नसत. इतकेच नाही तर त्यांच्याकडे जवळजवळ पंचवीस वर्षे घरकाम करत असलेल्या नोकराला देखील त्यांनी कामावरून काढून टाकले होते असे त्यांचे शेजारी सांगतात. ऋतुराज त्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्यासोबत अमेरिकेला घेऊन गेला, पण तिथूनही त्या आठवड्याभरातच परतल्या. आपण आता वृद्धाश्रमात राहायला जाणार असे त्या वारंवार सांगत असत. त्यामुळे त्या दिसेनाश्या झाल्यावर त्या कदाचित तिथेच गेल्या असाव्यात अशी त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांची समजूत झाली.

पोलिसांना जेव्हा आशा यांचा मृतदेह सापडला, तेव्हा आशा यांचे केवळ अस्थिपंजर शिल्लक राहिले होते. त्यामुळेच त्यांच्या मृत्युला अनेक महिने उलटून गेल्याचे समजले. तसेच पोलिसांना आशा यांनी लिहिलेले पत्रही सापडले. त्या पत्रामध्ये, आपण आत्महत्या करीत असून आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असे म्हटले आहे. पोस्ट मॉर्टेम मध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसल्याने आता केमिकल अनालिसिस करिता आशा यांचा मृतदेह पाठविला गेला असल्याचे समजते. विशेष म्हणजे आशा यांचा मृतदेह इतके महिने घरात असूनही कुणालाही त्याची काहीच खबर नव्हती किंवा कसली दुर्गंधीही कधी तेथील रहिवाश्यांना जाणवली नाही. याचे कारण असे, की आशा राहत असलेल्या बिल्डींगच्या शेजारीच एक नाला आहे, त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारची दुर्गंधी सतत येताच असते. त्यामुळे आशा यांच्या सडलेल्या मृतदेहाची दुर्गंधी जाणविली नसल्याचे येथील रहिवासी सांगतात.

Leave a Comment