अतिरेक्यांवर दहशत


भारतीय लष्कराने गेल्या दोन-तीन महिन्यात भारत-पाकिस्तान सीमेवर आणि त्यातल्या त्यात जम्मू-काश्मीरशी लगत असलेल्या सीमेवर कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे दहशतवाद्यांवर भारतीय लष्कराची एवढी दहशत बसली आहे की पाकिस्तान आणि पाकिस्तान लगतच्या भारतीय हद्दीत दहशतवाद्यांची भरती जवळपास बंद झाली आहे. भारतीय गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीमध्ये ही गोष्ट उघड झाली आहे. २०१२ पासून आतापर्यंतच्या भारतीय लष्कराच्या कारवाईत ठार झालेल्या अतिरेक्यांच्या आकड्यांचा अभ्यास केला असता २०१६-१७ या वर्षात सर्वाधिक अतिरेकी मारले गेले असून त्यांच्या घुसखोरीचे प्रमाणसुध्दा कमी झाल्याचे दिसले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये काही विशिष्ट वस्त्यांत अचानकपणे काही मुले बेपत्ता होतात. त्यांचा मागोवा घेतला की ते दहशतवादी संघटनेमध्ये भरती होण्यासाठी पळून गेले असल्याचे लक्षात येते. त्यामुळे गुप्तचर संघटना अशा मुलांवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. या वर्षी असे ७१ जण बेपत्ता झाले आहेत. ज्या कालावधीमध्ये ही भरती झाली त्याच कालावधीत मारले गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या मात्र १३२ इतकी आहे. २०१६ पर्यंतच्या एका वर्षात ७९ इतके दहशतवादी मारले गेले होते. परंतु या वर्षी त्यांचा आकडा दीडपटींपेक्षा जास्त झाला आहे. २०१२ आणि १३ या वर्षातील आकडेवारीनुसार असे लक्षात येते की त्या वर्षात यंदाच्या मानाने फारच कमी अतिरेकी मारले गेले होते. यावर्षी मात्र त्यांची संख्या एकदम वाढली आहे.

दहशतवाद्यांच्या संख्येतसुध्दा विदेशी तरुणांचे प्रमाण कमी झाले आहे. १३२ मारले गेलेल्या दहशतवाद्यांत ७४ विदेशी तर ५८ स्थानिक होते. मात्र त्यांचा मोठ्या प्रमाणावर खात्मा केल्यामुळे या वर्षी देशातील तरुण दहशतवादाकडे वळत नाहीत. बुर्‍हाण वाणी यांच्या हत्येनंतर राज्यात जवळपास पाच अतिरेकी म्होरके मारले गेले. धाडसाने दहशतवादी कामे करणारे अतिरेकी असे मारले गेल्यामुळे दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. काश्मीरचा प्रश्‍न एका बाजूला जनतेशी प्रेमालाप करून सोडवायचा सरकारचा निर्धार आहे. परंतु हेच सरकार दहशवाद्यांच्या बाबतीत मात्र कठोर झाले आहे आणि तसे ते कठोर झाल्याशिवाय दहशतवाद्यांचा कणा मोडला जाणार नाही. या धोरणाच्या बाबतीत केंद्र सरकार ठाम आहे आणि याच मार्गाने अतिरेक्यांना वठणीवर आणून जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा सरकारचा निर्धार आहे.

Leave a Comment