आर्थिक लढाई कशी होईल?


भारत आणि चीन यांच्यात डोकलाम परिसरात खडाखडी सुरू आहे. केवळ खडाखडी सुरू असली आणि ती बराच वेळ चालली की हे लक्षात येते की दोन्ही पैलवानांची प्रत्यक्ष कुस्ती खेळण्याची मनःस्थिती नाही. डोकलाम परिसरातील खडाखडीने हे पुरतेपणी दाखवून दिले आहे की भारत आणि चीन या दोघांनाही प्रत्यक्ष युध्द करणे हे आपल्याला परवडणार नाही याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे भारताने डोकलाम भागातून आपले सैन्य हलवावे असे इशारे वारंवार चीनकडून दिले जात असूनही भारत आपले सैन्य एक इंचही मागे हटवत नाही. आपण चीनचे आवाहन फेटाळून लावले तरीही त्यामुळे चिडून चीनचे लष्कर भारतावर हल्ला करणार नाही. याची खात्री भारताला पटली आहे. म्हणूनच चीनने सूर बदलायला सुरूवात केली असून सामरिक युध्दाच्या ऐवजी आर्थिक लढाई छेडण्याच्या धमक्या द्यायला सुरूवात केली आहे. भारतातही सरकार चीनला अशा धमक्या देत नसल्या तरी भारतीय लोक चीनला शरण आणण्यासाठी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमा आखायला लागल्या आहेत.

शेवटी अशा प्रकारचे आर्थिक युध्द झालेच तर त्यात काय घडेल याबाबत आता अर्थतज्ञांचे अंदाज व्यक्त व्हायला लागले आहेत. भारतातून चीनला किती करोड रुपयांचा माल जातो आणि चीनकडून भारताला किती अब्ज रुपयांच्या वस्तू पाठवल्या जातात यांचे आकडे समोर यायला लागले आहेत. त्या आकड्यावरून तरी असे लक्षात येते की चीनने भारताचा सगळा माल आयात करणे बंद केले तर चीनचे फार नुकसान होणार नाही. मात्र भारताने चीनचा माल बंद केला तर भारताचे मात्र मोठे नुकसान होईल. एकंदरीत या आर्थिक युध्दामध्ये चीनचे नुकसान भारतापेक्षा कमी होईल. आकड्यांमध्ये सांगायचे झाले तर चीनचे एकुणात होणारे नुकसान कमी आहेच पण ते नुकसान चीनच्या निर्यात व्यापारात एक नगण्य एवढे असेल. उलट भारताचे होणारे नुकसान एकूण आकड्यातही मोठे असेल आणि ते भारताच्या निर्यात व्यापार्‍यात मोठे असेल. चीनी मालावर भारतीयांनी बहिष्कार टाकलाच तर चीनने दाती तृण धरून भारतासमोर शरणागती पत्करून भारताची माफी मागावी अशी काही स्थिती नाही. हे असे का घडेल हे समजून घेण्यासाठी भारत आणि चीन यांच्यातला व्यापार नेमका आहे तरी कसा याचा शोध लावावा लागेल. तसा तो घेतला असता बहिष्काराच्या अस्त्राने लढवल्या जाणार्‍या लढाईत भारताचे नुकसान चीनपेक्षा मोठे असेल. तेव्हा चीनी मालावर बहिष्कार घालण्याचा विचार करणार्‍यांनी याचाही विचार केला पाहिजे.

चीनी मालावर बहिष्कार घातल्याबरोबर चीन शरण येईल आणि आपले मोठे परकीय चलन वाचेल अशा कल्पना करणार्‍या देशभक्तांना चीनच्या निर्यातीचे आणि भारताच्या निर्यात व्यापाराचे नेमके स्वरूपच माहीत नाही. चीनकडून भारताला दरसाल ५८.२५ अब्ज डॉलर्स म्हणजे ५ हजार ८२५ कोटी डॉलर्स एवढ्या किंमतीचा माल २०१६ साली पाठवण्यात आला. त्या मालामध्ये रंगाच्या पिचकार्‍या, मेंदीचे कोन, विजेच्या रोषणाईच्या माळा आणि कमी किंमतीतल्या सायकली अशा वस्तूंचा तर समावेश होताच परंतु याच मालामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणारे सुटे भाग आणि स्मार्ट फोनच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे गुंतागुंतीचे छोटे भाग यांचाही समावेश होता. चीनकडून आपण ५८.२५ अब्ज डॉलर्सचा माल आपण आयात केला. त्या उलट भारताने चीनला ११.७६ अब्ज डॉलर्स इतक्या किंमतीचा माल पाठवला. म्हणजे आपण चीनला जो माल पाठवतो त्याची किंमत चीनकडून आपण घेतो त्या मालाच्या एक षष्ठांश आहे. म्हणजे आपण आणि चीनने परस्परांच्या मालावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली तर चीनचे ५८ अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल तर भारताचे ११.७६ अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल.

चीन आपल्याला जो माल पाठवतो त्याची एकूण किंमत कितीही मोठी असली तरी ती निर्यात चीनच्या एकूण निर्यात व्यापारात फार नगण्य आहे. अर्थतज्ञांच्या अंदाजानुसार चीनकडून भारताला होणारी निर्यात ही चीनच्या एकूण निर्यात व्यापाराच्या केवळ दोन टक्के एवढी आहे. म्हणजे आपण चीनी मालावर बहिष्कार घालून चीनचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे होणारे चीनचे नुकसान त्याच्या एकूण उलाढालीत अगदी नाममात्र एवढे आहे आणि एवढे नुकसान होते म्हणून चीन भारतापुढे शरणागती स्विकारेल अशी काही शक्यता दिसत नाही. भारताकडून चीनला जो माल पाठवला जातो. त्याचे एकूण मूल्य ११.२५ अब्ज डॉलर्स एवढे आहे आणि भारताच्या निर्यात व्यापारात एकुणात हा मोठा वाटा आहे. मात्र चीनच्या अर्थव्यवस्थेत त्यामुळे काही फरक पडत नाही. भारतात मात्र एवढी निर्यात बंद झाल्याने होणारे नुकसान लक्षात येईल एवढे असेल. हे नुकसान भारतीय निर्यातीमध्ये मोठे असल्यामुळे त्याचा जाणवणारा परिणाम भारतासाठी लक्षणीय असा असेल. एका वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर एका लहान प्राण्याने मोठ्या प्राण्याला फटके मारण्यासारखे आहे. मोठ्याचा एकच फटका लहानाच्या जिव्हारी लागू शकतो मात्र लहानाने कितीही फटके मारले तरी मोठ्याच्या केसावरसुध्दा परिणाम होणार नाही.

Leave a Comment