जरठ-बाला विवाह


हैदराबाद शहरामधील गरीब मुस्लीम कुटुंबातील मुलींना फूस लावून त्यांचे अरबास्तानातल्या श्रीमंत शेखांशी विवाह लावून देऊन त्या बदल्यात लाखो रुपये मिळवणार्‍या टोळ्या हैदराबाद शहरामध्ये सतत कार्यरत असतात. अशाच एका विवाहाचे प्रकरण आता उपस्थित झालेले आहे. सोळा वर्षाच्या एका मुलीचा विवाह ओमानमधील ६५ वर्षांच्या व्यक्तीशी लावून दिल्याचे प्रकरण चर्चेत आलेले आहे. या प्रकरणात विवाहासाठी मध्यस्थी करणारे मुलीचे नातेवाईक आणि लग्न लावून देणारा काझी यांना या श्रीमंत ओमानी शेखाने ५ लाख रुपये दिल्याचा आरोप होत आहे. अशा अनेक प्रकरणांमध्ये मुलींचे गरीब आईबापच मुलींचा विवाह लावून देतात आणि त्याबदल्यात लाखो रुपये घेऊन आपले आर्थिक प्रश्‍न सोडवतात.

या प्रकरणात मात्र या विवाहाची कसलीही कल्पना मुलीच्या आईवडिलांना नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या मुलीशी दगाबाजी करून आपल्या नातवाईकांनी हा विवाह लावून दिला, अशी तक्रार पोलिसात केली आहे. हा ओमानी गृहस्थ आपल्या तरुण पत्नीला घेऊन स्वदेशी रवानासुध्दा झालेला आहे. परंतु आता या मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांना मुलीला परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. आपल्या १६ वर्षाच्या मुलीचा विवाह झालेला आपल्या मातापित्यांना माहीत नव्हता आणि आपल्या मुलीचा अपहरण करून हा विवाह लावण्यात आला आहे असे त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

त्यांनी तक्रारीत काहीही म्हटले असले तरी या मुलीची सारी कागदपत्रे तयार करताना त्यांना काहीच माहिती नव्हती असे मानणे अतिशयोक्तीचे ठरेल. हैदराबादमध्ये असे प्रकार नित्य घडत असतात. तिथल्या गरीब कुटुंबांमधून मुलांची आणि मुलींची संख्या मोठी असल्यामुळे या कुटुंब प्रमुखांना मुलींची उपजीविका, त्यांचे शिक्षण आणि त्यांचे लग्न यासाठी पैशाची जमवाजमव करणे फार कठीण जाते. अशा गरीब लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या मुलींचे विवाह मध्य पूर्वेतल्या अती श्रीमंत व्यापार्‍यांशी लावून दिले जातात. १९८२ साली याच विषयाला धरून बजार हा हिंदी चित्रपट आला होता. नसरुद्दीन शहा, फारूक शेख, स्मिता पाटील आणि सुप्रिया पाठक यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात मुली कशा बेमालूमपणे विकल्या जातात आणि त्यामागची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक कारणे कोणती असतात यावर चांगलाच प्रकाश पडला होता.

Leave a Comment