राजीव हत्येचे खरे सूत्रधार कोण?


भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या होऊन आता २५ वर्षे उलटून गेली आहेत. त्यांच्या हत्येमागे आणि हत्येत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असणारे १७ आरोपी सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यातील नलिनी ही राजीव गांधींच्या हत्येतील प्रत्यक्ष आरोपी आहे. किमान तसे मानले तरी जाते. परंतु सोनिया गांधी आणि प्रियंका वड्रा यांनी नलिनीला निर्दोष ठरवून सोडून देण्यात यावे अशी मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य केली नाही. परंतु सोनिया गांधींनी अशी मागणी का करावी हा मोठा प्रश्‍न आहे. गांधी परिवाराशी जवळीक असणार्‍या काही नेत्यांचे आणि जाणकार पत्रकारांचे म्हणणे असे आहे की नलिनी ही मुळात आरोपी नाहीच आणि सोनिया गांधी यांना हे माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी नलिनीच्या सुटकेची मागणी केली होती.

राजीव गांधींच्या हत्येमागे तामिळनाडूमधील लिट्टे संघटनेचा हात असल्याचा सार्वत्रिक समज आहे आणि नलिनी ही याच संघटनेची सदस्य असल्यामुळे तिला ही शिक्षा झालेली आहे. प्रत्यक्ष हा समज खोटा असून भारतातल्याच काही लोकांनी राजीव गांधी यांची हत्या घडवली आहे असे मानणारा एक वर्ग आपल्या देशात आहे. ज्या उच्च पदस्थांनी राजीव गांधींची हत्या घडविली त्यांनी हे प्रकरण दाबून टाकले आणि घाईघाईने लिट्टे संघटनेला आरोपी ठरवून आपल्यावरचे किटाळ दूर सारले. राजीव गांधींच्या हत्येमागे खरा हात असलेले हे सारे लोक उघड झाले पाहिजेत परंतु तसे ते होत नाहीत. या प्रकरणातला एक आरोपी ए. जी. पेरारीवलन याने आता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून या हत्येतले खरे आरोपी शोधण्यासाठी नव्याने तपास व्हावा अशी मागणी केली आहे.

अर्जदार पेरारीवलन हा या प्रकरणातला मुख्य आरोपी नाही. परंतु राजीव गांधींच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या मानवी बॉम्बसाठीची बॅटरी त्याने तयार केली होती. अशी अगदी नगण्य कामगिरी केलेली असतानाही तो गेल्या २५ वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याने अर्ज करून या हत्येमागचे खरे आरोपी शोधून काढावेत अशी मागणी केली आहे. त्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतला असून त्याची मागणी विचारात घ्यायचे ठरवले आहे. पेरारीवलन याने केवळ बॅटरी तयार केली परंतु ती कोणासाठी आणि कशासाठी केली जात होती हे त्याला माहीत नव्हते म्हणून त्याने आता सरकारनेच याचा शोध लावावा अशी मागणी लावून धरली आहे. ही मागणी मोठी सूचक आहे आणि तिच्यात राजीव हत्येचे पूर्ण प्रकरण नव्याने उकरून काढण्याची ताकद आहे.

Leave a Comment