शुद्ध सोने निर्यातीवर भारत सरकारची बंदी


सोने व्यवसायातील ट्रेडिंग व्यवहारात होत असलेली गडबड लक्षात घेऊन त्याला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने ज्या सुवर्ण उत्पादनांची शुद्धता २२ कॅरेट पेक्षा अधिक आहे त्यांच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात परराष्ट्र व्यापार विभागाच्या महासंचालकांनी नोटीस जारी केली आहे.

या नोटिसीनुसार सोन्याचे दागिने, नाणी, पदके यांच्या शिपमेंटवर बंदी घातली गेली असून त्या संदर्भातला अहवाल ब्ल्यूमबर्गने प्रसिद्ध केला आहे. इंडिया बुलीयन अॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनचे सहसचिव केतन श्रॉफ या संदर्भात बोलताना म्हणाले की सोने ट्रेडिंग मध्ये होत असलेले अनियमित व्यवहार कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. भारताने कांही देशांबरोबर केलेल्या ट्रेडिंग कराराचा आधार घेऊन कांही ट्रेडर्स सोने आयात कमी कर भरून करत आहेत आणि हे सोने दुसर्‍या देशांना निर्यात केले जात आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा निर्यातदारांना होणार आहे कारण त्यांना सोन्यावरचा १० टक्के आयात कर द्यावा लागणार नाही.

यंदा भारतात सोने आयातीचे प्रमाण गतवर्षीच्या दुपटीने वाढले असून द. कोरियात सोने खरेदीत झालेली वाढ भारताच्या पथ्यावर पडते आहे. द.कोरिया आणि भारत यांच्यात फ्री ट्रेड करार झाला आहे.

Leave a Comment