हिमखंडाखाली आगीचे लोळ


सध्या ग्लोबल वार्मिंगचे परिणाम सर्वांनाच जाणवायला लागले आहेत. पण या उष्णतेचा जगातल्या सर्वात थंड प्रदेशावरही जाणवण्याइतका परिणाम व्हावा ही गोष्ट नवलाचीच मानली पाहिजे. उत्तर ध्रुवावरचे काही हिमखंड या उष्णतेने वितळायला लागले असून हे वितळलेले जादा पाणी वाहून समुद्रात येत आहे. बांगला देशासारख्या बेटांच्या जवळ समुद्राचे पाणी वाढून मानवी वस्ती जलमय व्हायला लागली आहे. विशेष म्हणजे या ध्रुवावर शतकानुशतके साठलेले बर्फ वितळून जमीन उघडी पडायला लागली आहे आणि या बर्फाच्या थराखाली नेमके काय आहे याचा शोध लावणे शक्य झाले आहे. आता असे लक्षात आले आहे की माणसाचे रक्तही गोठवून टाकणार्‍या या थंडीखाली चक्क गरम पाण्याचे झरे आहेत.

हे एक नवलच मानले पाहिजे. पण दक्षिण ध्रुवावरील स्थितीही काही फार वेगळी नाही. तिथेही सारे काही गोठवून टाकणारे थंड हवामान आहे पण त्याच्याखाली चक्क ज्वालामुखी आहे. दक्षिण ध्रुवावर आता पर्यंत ९१ ज्वालामुखी असल्याचे दिसले आहे. यातल्या काही ज्वालामुखींचे स्फोट झाले असून ते कधीही भडकू शकतात अशा स्थितीत आहेत. यातल्या ज्वालामुखीचा अगदी अलीकडे झालेला स्फोट २०१५ सालचा आहे. काही ज्वालामुखी काही शतकांपूर्वी जागे झाले होते असे त्यांनी फेकलेल्या आणि या बर्फाळ प्रदेशात साठलेल्या त्यांच्या लाव्हा रसाच्या निरीक्षणातून दिसून आले आहे. आरगो पॉइंट या ज्वालामुखीचा स्फोट ९ लाख ते १४ लाख वर्षांपूर्वी ्रझाला असावा असा अंदाज आहे तर बर्ड या ज्वालामुखीचा स्फोट २८ लाख ते ४६ लाख वर्षपूर्व या कालावधीत झाला होता. काहींचा तर कालाचा निर्णयही करता येत नाही.

गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या लाव्हा रसाचे विश्‍लेषण केले असता असे दिसून आले आहे की त्यात सोन्याचे बारीक बारीक कण आहेत. याचा अर्थ या परिसरात भूपृष्ठाच्या खाली सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता आहे. शेवटी या दोन्ही ध्रुवावर मानवी वस्ती करण्यासारखी स्थिती नसतानाही तिथे आपले तळ उभारण्याची चढाओढ का लागली आहे ? असा प्रश्‍न काही वेळा उपस्थित होतो. तिथे वस्ती करता येत नसली तरी खाली काही मौल्यवान धातूंचे साठे किंवा इंधन तेलाचे साठी सापडू शकतात. माणसाचा शोध पाणी आणि इंधन यांच्यासाठी चाललेला आहे. तो या दोन ध्रुवांवर संपला तर मानवतेला ते वरदानच ठरणार आहे.

Leave a Comment