चीनची टेहळणी आवश्यक


सध्या आपल्या देशामध्ये चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची जबरदस्त भावना निर्माण झालेली दिसत आहे. काल देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. त्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी चिनी मालाच्या बहिष्काराच्या घोषणा दिल्या. चीन जर आपल्या खोड्या काढत असेल तर त्याचा माल विकत घेऊन त्याला मदत करण्यात काय अर्थ आहे असा खडा सवाल लोकांनी उपस्थित केलेला आहे. या निमित्ताने आपण चीनच्या निर्यात व्यापाराला फार मोठा धक्का लावू शकणा नाही आणि चीनने घाबरून आपल्याला शरण यावे एवढी तर हानी नक्कीच पोहोचवू शकणार नाही. कारण चीनचा निर्यात व्यापार आपल्यापेक्षा अमेरिकेशी जास्त आहे आणि भारताशी तो असला तरी त्यातल्या काही आयात वस्तूंची भारतालाच गरज आहे.

आपण चिनी मालावर सरसकट बहिष्कार टाकला तर अशा काही गोष्टींवर बहिष्कार टाकावा लागेल ज्यांची आपल्याला गरजही आहे आणि आपण बहिष्कार टाकल्यास चीनपेक्षा आपलेच नुकसान जास्त होणार आहे. तरीसुध्दा चिनीमालाच्या निर्यातीवर पाच-दहा टक्के एवढा जरी परिणाम करू शकलो तरीही चीनला विचार करावा लागणार आहे. कारण तिथे आदीच औद्योगिक मंदी आहे. त्यात हा निर्यात मालाला बसणारा फटका त्याला परवडणारा नाही. असे असले तरी काही वस्तूंच्या बाबतीत आपण चीनवर पूर्ण अवलंबून आहोत. सध्या स्मार्टफोनच्या निर्मितीत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु भारतातल्या स्मार्ट फोन निर्मिती करण्यासाठी लागणारे सुटे भाग चीनकडूनच येत असतात. तेव्हा त्यांच्यावर आपण बहिष्कार टाकला तर आपल्या स्मार्ट फोनच्या धंद्यावर परिणाम होईल.

असे असले तरी सरकारने चीनमधून येणार्‍या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तू यांच्यावर कडक नजर ठेवायचे ठरवले आहे. त्यामागचा हिशोब मात्र आर्थिक नाही. अशा सुट्या भागांची भारतात निर्यात करण्यामागे चीनचा हेतू काय आहे हे सरकारला समजून घ्यायचे आहे. अशा प्रकारची साधने भारतात पाठवून चीन भारतातल्या लोकांची काही गोपनीय माहिती मिळवत आहे का हे सरकारला जाणून घ्यायचे आहे. अशा मार्गाने हेरगिरीसुध्दा करता येऊ शकते आणि या मालांच्या व्यापारातून आपल्याला दरवर्षी २२ अब्ज डॉलर्स एवढे परकीय चलन आपण खर्च करत असतो. त्याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे.

Leave a Comment