रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्‍न


गेल्या ७० वर्षांपासून म्यानमारला सतावणारा रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्‍न हा बघता बघता भारताचा प्रश्‍न होऊन बसला आहे. रोहिंग्या मुस्लिम हे म्यानमारमधील आहेत पण म्यानमारमधील बहुसंख्या बौद्ध लोक त्यांना आपल्या देशातले मानायला तयार नाहीत. त्यामुळे या लोकांनी आता कोठे जावे असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. भारताची ईशान्येची सीमा बरीचशी म्यानमारला लागून आहे. या सीमेवर किती कडक बंदोबस्त हे आपल्याला माहीतच आहे. या बंदोबस्तातली ढिलाई आणि सीमेवर कुंपण नसणे यामुळे ज्यांना कोठेच थारा नसतो असे लोक भारतात सुखेनैव घुसखोरी करतात आणि त्यांना भारतात आधारही मिळतो. त्यामुळेच भारताच्या ईशान्येतल्या राज्यांत अनेक बांगला देशी लोक येऊन राहतात.

आता हे रोहिंग्या मुस्लिमही भारतात घुसले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची भारतातली संख्या १० हजार होती. पण दोन वर्षात ते ४० हजारावर गेले आहेत. आता सरकारला त्यांचा प्रश्‍न डाचायला लागला असून केन्द्र सरकारने या ४० हजार रोहिंग्या मुस्लिमांना भारतातून घालवून देण्याचे ठरविले आहे. गृह राज्यमंत्री किरण रिजजू यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी त्यांची संख्या १० हजार झाली तेव्हाही रिजजू हेच गृह राज्यमंत्री होते आणि ही संख्या ४० हजारावर गेली तेव्हाही तेच मंत्री आहेत. मग त्यांनी ही संख्या वाढू नये यासाठी काय केले असा प्रश्‍न निर्माण होतो.

मुळात हा प्रश्‍न का निर्माण झाला आहे हे पाहिले पाहिजे. म्यानमारमध्ये रहात असणारे हे लोक मुळातले म्यानमारच्या आरकान प्रांतातले आहेत. या प्रांताला रोहिंका असे म्हणतात आणि त्यावरूनच त्यांना रोेहिंग्या हे नाव पडले आहे. स्वत: हे लोक हाच इतिहास सांगत असतात आणि तो तसा तीनशे वर्षांपासून सांगितला जात आहे पण १९४८ साली म्यानमार स्वतंत्र झाला आणि तिथल्या बहुसंख्य बौद्धांनी रोहिंग्या मुस्लिम हे आपल्या देशातले असल्याचे नाकारायला सुरू केले. ते बंगाली आहेत आणि त्यांचे मूळ आताच्या बांगला देशात आहे असे म्यानमारच्या बौद्धांचे म्हणणे आहे. १९६५ साली तर रोहिंग्या हटाव मोहीम सुरू झाली आणि या मुस्लिमांना सतत त्रास सुरू झाला. एकदा हे लोक बोटीत बसून समुद्रमार्गे बांगला देशाकडे निघाले आणि त्यांनी आता तिथेच जबरदस्तीने रहायचे ठरवले. पण बांगला देशात त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यावर त्यांनी भारतात घुसखोरी करून विविध राज्यात बस्तान बसवायला सुरूवात केली. आज त्यांची संख्या ४० हजारावर गेली आहे.

Leave a Comment