काही शहरांमधील विशेष मान्यता..


आपल्या भारतामध्ये काही ठिकाणे अशी आहेत जी तिथल्या रूढी – परंपरांमुळे ओळखली जातात. त्या त्या गावांमध्ये काही ठराविक मान्यता आहेत. आता याला विश्वास म्हणा, किंवा संयोग.

जिथे कुठल्याही घरांना दारेच नाहीत असे गाव म्हणजे महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध देवस्थान. शनी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेले हे ठिकाण. हे देवस्थान इतके जागृत आहे असे म्हणतात की त्याच्या प्रभावामुळे या गावात कधी ही कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य, चोऱ्या इत्यादी घडतच नाही. त्यामुळे युको बँकेने देखील या गावाचा महिमा ध्यानात ठेवत देशभरातील पहिलीच ‘लॉकलेस’ म्हणजे कुलुपे नसलेली बँक या गावामध्ये उघडली आहे.

शेटफळ हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामधले अजून एक अजब गाव. हे गाव नागदेवतेच्या पूजनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील जवळ जवळ प्रत्येक घरामध्ये नाग येऊन वास्तव्य करतात. तरी ही या गावामध्ये सर्पदंशाची एकही घटना घडलेली ऐकिवात नाही.

जुळ्या मुलांचे गाव, कोडीन्ही : केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील हे गाव. या गावाची विशेषता अशी की इथल्या २००० च्या जवळपास असणाऱ्या लोकसंख्येमध्ये तब्बल साडे तीनशे जुळी मुले आहेत. हे कसे काय घडले असेल या प्रश्नाने शास्त्राज्ञांनाही कोड्यात टाकले आहे. पूर्ण वंशामध्ये जुळी मुले नसलेल्या दाम्प्यत्यांना या गावामध्ये जुळी मुले झाली असल्याचे या गावात आढळून आले आहे.

हाडांच्या सापळ्यांनी भरलेला तलाव : उत्तराखंडातील रूपकुंड या तलावामध्ये एक ना दोन, तर चक्क सहाशे च्या आसपास मानवी हाडांचे सापळे सापडले आहेत. हे सापळे या तलावामध्ये कसे आले हे मात्र कळू शकलेले नाही.

मायोंग, आसाम : काळी जादू, चेटूक इत्यादी अघोरी प्रकारांसाठी प्रसिद्ध झालेले आसाम मधील मायोंग हे गाव. संस्कृत शब्द ‘ माया ‘ म्हणजे जादूटोणा, यावरूनच या गावाला हे नाव पडले असावे असा समज आहे. गावातील अनेक पुरुष पाहता पाहता नाहीसे झाल्याच्या घटना इथे घडल्या असल्याचे सांगितले जाते. तसेच माणसांचे रूपांतर जादुटोण्याने जनावरांमध्ये केले गेल्याच्या घटना ही इथे घडल्या असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment