चीन नरमला


भारत आणि चीन यांच्या सीमेवर सध्या सुरू असलेल्या डोकलाम विषयीच्या वादात चीन सरकार काही प्रमाणात नरमले असून चीनने आपले या भागात जमवलेले सैन्य १०० मीटर मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. प्रत्यक्षात चीनने २५० मीटर मागे जाणे अपेक्षित आहे पण त्याने सध्या १०० मीटर मागे हटण्याची तयारी दाखवणे हा भारताचा राजनैतिक विजय मानला जात आहे. चीनने तिथे घुसखोरी केली असल्याने भारताने त्याला हरकत घेतली आणि तिथे आपले सैन्य घुसवले. त्यातून तिथला तणाव वाढला आहे. डोकलाम हा भूतानचा भाग असतानाही चीन तिथे घुसून सडका तयार करीत आहे. चीनने अशाच रीतीने तिबेटला गिळले आहे. भूतानच्या बाबतीत असे काही होऊ नये म्हणून भारत भूतानच्या मदतीला धावला आहे.

त्यामुळे वैतागलेल्या चीनने भारताला परत जाण्याबाबत इशारे द्यायला सुरूवात केली होती. पण भारताने त्यास नकार तर दिलाच पण चीनच्या डोळ्यास डोळा भिडवायला सुरूवात केली आहे. म्हणून चीन सरकारने काही कूटनीतीचें प्रयोग सुरू केले आहेत. पूर्ण डोकलाम परिसर घशात घालायचा असेल तर भारताशी लढण्यापेक्षा काही डावपेच लढवावेत म्हणून चीनने भूतानला भरीस घालायला सुरूवात केली. दोन दिवसांपूर्वी भूतान सरकारचे एक निवेदन चीनने जाहीर केले. त्यात डोकलाम हा भाग चीनचा असल्याचे भूतानने मान्य केले असल्याचे आणि आता भारताला येथून जावेच लागेल असे चीन सरकारने म्हटले.

हा आगलावेपणा भूतानच्या सरकारला कळला आणि आता भूतानने या विधानावर ठाम रहावे असा दबावही चीनकडून येणार हे भूतानच्या सरकारला दिसायला लागले. त्यावर भूतान सरकारने सावध होऊन या डावावर प्रतिडाव टाकला आणि आपण डोकलाम चीनचा असल्याची कबुली दिलेली नाही असा जाहीर खुलासा केला. त्यामुळे भूतानवर दबाव आणण्याचा हा चीनचा कावा फसला. त्यानंतर अमेरिकेची प्रतिक्रिया प्रथमच जाहीरपणाने समोर आली. अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनी डोकलाम प्रकरणात आपले मत मांडले असून चीन या प्रश्‍नात विनाकारण आक्रमक धोरण स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतून ही प्रतिक्रिया येताच चीनला या प्रकरणात आपली बाजू लंगडी होत असल्याचे जाणवले असून चीनने आता आपला आवाज मावाळ केला आहे. त्यातूनच ही १०० मीटर मागे जाण्याची तयारी निर्माण झाली आहे. अर्थात भारत सरकार अशा युक्त्यांनी नमणार नाही. चीनला २५०मीटग मागे जावे लागणार आहे.

Leave a Comment