पालकहो सावधान


पालकांना एक सावधानतेची सूचना देण्यात येत आहे की मुले इंटरनेट आणि मोबाईल फोनच्या नादी लागली आहेत अशा एका अवस्थेच्या फार पुढे आपण जात आहोत. एक तर मुलांच्या या वापराचे प्रमाण अतीशय विकृतीत जमा व्हावे या पातळीवर आले आहेच पण आता पाच वर्षांची मुले आणि मुलीही या व्यसनाच्या आहारी जायला लागली आहेत. एका पाहणीत असे आढळून आले आहे की, पाच ते १५ वर्षे वयोगटातली मुले आणि मुली आता आपल्या आठवड्यातले सरासरी १५ तास के वळ इंटरनेटवर खर्चायला लागली आहेत. भारतात तर अजून बराच मोठा समाज या माध्यमांपासून दूर आहे पण तरीही जो समाज ही सारी साधने वापरत आहे त्या समाजात हे इंटरनेटचे वेड हाताबाहेर जायला लागले आहे.

पालकांनी आता ही मुले या व्यसनांपासून कशी दूर राहतील यावर लक्ष दिले पाहिजे असे ही पाहणी करणारांना दिसायला लागले आहे. आता आपण ऑन लाईन माध्यमांच्या वापरात तरबेज असलेली एक पिढी घडवत आहोत याची जाणीव या पालकांत जागी असण्याची गरज वाटत आहे. यासाठी आता आधी पालकांना या व्यसनांपासून दूर रहावे लागेल आणि आपले मूल या पासून दूर रहावे यासाठी त्याला पालकांनी वेळ द्यावा लागेल. इंटरनेट, संगणक आणि फास्ट फूड हे तीन शाप सोबत घेऊन ही पिढी जगायला लागली असून तिला या शापांपासून वाचवण्यासाठी सक्रियपणाने काही न केल्यास ही पिढी आपल्या हातून जाणार आहेे.

सोशल मीडियात काम करणार्‍या कंपन्यांना आपल्या कंपन्यांच्या भवितव्याचा विचार अस्वस्थ करीत आहे. त्यांना उद्याची काळजी लागली आहेे. म्हणून त्यांनी लहान मुलांवर अर्थात आपल्या उद्याच्या ग्राहकांवर लक्ष केन्द्रित करायला सुरूवात करून या मुलांना आकृष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कोवळ्या वयातली ही मुले कोणत्याही आकर्षणाकडे पटकन आकृष्ट होतात. तेव्हा त्यांना आकृष्ट करणे या कंपन्यांनी बंद केले पाहिजे असे बाल संगोपन शास्त्रातले तज्ज्ञ सांगत आहेत. आता पालकांनी आपल्या मुलांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी काय करावे याचा विचार केला पाहिजे. आपण फार बिझी आहोत असा बहाणा करून मुलांपासून दूर राहणे आता पालकांनी बंद केले पाहिजे. मुलांच्या या आकर्षणाचा आणि फास्ट फूडचा जवळचा संबंध आहे तेव्हा मुलांची निरोगी वाढ व्हावी यासाठी या दोन गोष्टी मुलांपासून शक्यतो दूर ठेवाव्यात असे ही तज्ज्ञ मंडळी सूचित करीत आहेत.

Leave a Comment