त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घ्या


पाकिस्तानच्या हिमाच्छादित डोंगररांगांमध्ये प्रदीर्घ काळपासून वास्तव्य करणार्‍या हुंझा या आदिवासी जमातीचे लोक सरासरी १०० वर्षे जगतात. म्हणजे या जातीच्या अनेक लोकांची वये १२० वर्षांपर्यंत आहेत. त्यातील काही लोक तर १०० वर्षांपर्यंत तर कसलाही आजार न होता जगतात. त्यांचे राहणीमान आणि निसर्गाशी असलेले सान्निध्य हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे असे त्यातल्याच काही लोकांचे म्हणणे असते. या जमातीतील ८० वर्षांची वृध्द स्त्रीसुध्दा सामान्यतः ४० वर्षाच्या महिलेइतकी सुंदर आणि टवटवीत असते. हे लोक स्वतःला अलेक्झांडर दि ग्रेट म्हणजे सिकंदर याच्यासोबत भारतात आलेल्या योध्यांचे वंशज समजतात.

१९२० साली रॉबर्ट मॅककॅरिसन याने या लोकांच्या जीवनपध्दतीवर आणि आहारावर अभ्यास केला असून त्यांच्या दीर्घायुष्याची काही कारणे नमूद केली आहेत. या अभ्यासाला १०० वर्षे झाली परंंतु अजूनही त्यात नमूद केल्याप्रमाणे हे लोक आपले जीवन व्यतित करत आहेत आणि निसर्गाशी नाते सांगणारा आहार घेत आहेत. त्यांच्या आरोग्याचे पहिले कारण म्हणजे त्यांच्या खाण्यातील पदार्थात किमान ४० टक्के पदार्थ हे कच्च्या स्वरूपात खाल्ले जातात म्हणजे ज्याला अग्नी किंवा तेलाचा स्पर्श झालेला नाही असे ते खाद्य असते. ते काही डाळी तर कच्याच खातात. या लोकांच्या खाण्यामध्ये द्राक्ष आणि मलबेरी ही फळे प्रामुख्याने असतात. त्यांच्यामुळे त्यांचे केस आणि त्वचा निरोगी राहते असा त्यांचा दावा आहे.

त्यांच्या खाण्यात साखर नाही. साखरेऐवजी ते मधाचा वापर करतात. साखरेमुळे अनेक रोग होतात पण मधामुळे अनेक रोग बरे होतात. त्यांच्या खाण्यात बदाम, शेंगादाणे, पिस्ता यांची विपुलता असते. त्यांचा ३० टक्के आहार हा ताज्या हिरव्या पालेभाज्यापासून बनलेला असतो आणि या भाज्या त्यांनी स्वतः रासायनिक खतांचा वापर न करता पिकवलेल्या असतात. त्यांच्या दीर्घायुष्याचे आणखी एक रहस्य म्हणजे ते शेळीचे दूध पितात. पनीर आणि दही हेसुध्दा शेळीच्या दुधापासून केलेले असते. त्यांच्या आहारामध्ये मांसाहार अतीशय अपवादात्मक प्रसंगातच केला जातो. ते पूर्णपणे शाकाहारी नाहीत परंतु काही विशेष आयोजन असेल तरच ते मांसाहार करतात. आपल्या खाण्यातील कमीत कमी मांसाहार हे एक आपल्या आरोग्याचे कारण असल्याचे त्यांचे मत आहे.