हरियाणातला पाठलाग


हरियाणा प्रदेश भाजपाच्या अध्यक्षांचे दिवटे चिरंजीव एका मुलीचा भररात्री पाठलाग करताना सापडले. भारतीय जनता पार्टीसाठी ही अतीशय लाजीरवाणी घटना आहे. एरवी असा प्रकार घडला असता तर जेवढी चर्चा झाली नसती एवढी आता या प्रकाराची होत आहे कारण या प्रकाराने हे सिद्ध केले आहे की, वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांचीही मुलगी गुंड मवाल्यांपासून सुरक्षित नाही. सामान्य कुटुंबातल्या मुलींचे तर काही विचारायलाच नको. या प्रकरणाची चर्चा होण्याचे दुसरे कारण म्हणजे हा गुंड मवाली दिवटा अन्य कोणाचा नाही तर राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा आहे. यात दोन्ही प्रकार अनपेक्षित आहेत. या प्रकरणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यात भाजपाची सत्ता आहे आणि मुख्यमंत्र्यांनी चुकूनही, या मवाल्यांना कडक शासन करा असे आदेश पोलिसांना दिलेले नाहीत.

मुख्यमंत्र्यांची ही बोटचेपी भूमिका लोकांच्या मनातला आक्रोश वाढवणारी ठरणार आहेेच पण या प्रकरणात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सुभाष बराला यांनीही कर्तव्य कठोर भूमिका घेतलेली नाही. या प्रसंगी एक जुना किस्सा आठवतो. कै. वसंतदादा पाटील यांचे चिरंजीव प्रकाशबापू यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात आपल्या काही सहकार्‍यांना नेले आणि तिथे आयुक्तांशी वाद घालून गोेंधळ घातला आणि फर्निचरची मोडतोड केली. ही बातमी मुख्यमंत्री म्हणून दादांना आधी कळवण्यात आली तेव्हा दादांनी पहिला फोन रिबेरो यांना केला. प्रकाश हा आपला मुलगा असला तरीही त्याचा विचार न करता त्याच्यावर कडक कारवाई करावी असे त्यांनी आयुक्तांना बजावले.

भाजपाच्या कोणत्याही नेत्याने आणि या आरोपी मुलाच्या वडिलांनी तरी आता हरियाणाच्या पोलीस आयुक्तांना असा तर फोन करणे सोडाच पण जाहीरपणेही कडक कारवाईचे निवेदन केलेले नाही. सुभाष बराला यांनी तर हद्दच केली. त्यांनी असा सवाल केला आहे की, ही मुलगी एवढ्या रात्री कोठे चालली होती ? हा त्यांचा सवाल बेजबाबदारपणाचा आहे. या देशात महिलांना रात्री घराच्या बाहेर जाण्याची मनाई आहे असे काही बराला यांंना म्हणायचे आहे का ? असा काही कायदा असल्यास त्यांनी सांगावे किंवा आता ते भाजपाचे प्रदेश शाखेचे अध्यक्ष आहेतच. त्यांनी आपल्या सरकारला असा एखादा कायदा करायला लावावा की, महिलांनी रात्री घराच्या बाहेर पडू नये. आणि त्या तशा बेरात्री घराबाहेर पडल्या तर आपल्या मुलासारख्या नरपुंगवांना अशा मुलींचा पाठलाग करण्याचा अधिकार आहे. त्यास त्या मुलीच जबाबदार राहतील. बराला यांनी आता असा कायदा करावाच.

Leave a Comment