श्रीमंतीपुढे माणुसकी पोरकी


सध्याच्या भोगवादी जीवनामध्ये आपण पैशाच्या एवढे मागे लागलो आहोत की अधिकाधिक पैसे कमवण्याच्या मोहात आपण नातेसंबंध आणि माणुसकी यांनासुध्दा पारखे होत आहोत. मुंबईत घडलेल्या एका घटनेने या गोष्टीवर शिक्कामोर्तबच केले आहे. आशाताई केदारनाथ सहानी ही वृध्द महिला मुंबईच्या वेल्स कॉल्ड सोसायटीत मरून पडल्या आणि त्यांच्या शरीराचे विघटन होऊन त्यांचा हाडाचा सापळा तयार झाला तरीही त्यांच्या शेजार्‍यांना आणि मुख्य म्हणजे अमेरिकेत राहणार्‍या त्यांच्या मुलाला कळलेसुध्दा नाही. फ्लॅट संस्कृती आणि अधिक पगारासाठी परदेशी जाणारी मुले तसेच त्यांच्या पाठीमागे स्वदेशात एकाकी जगणारे त्यांचे आईवडील या प्रकारांवर या घटनेने चांगलाच भेदक प्रकाश पडला आहे. एका नाटकात एक बाई आपल्या नवर्‍याला सांगत असते, अहो, आपल्या शेजारचे म्हातारे काका देवाघरी गेले आहेत बरं का! त्यावर नवरा विचारतो, तुला कसे माहीत? त्यावर पत्नी उत्तर देते, हे काय आजच्या पेपरमध्ये छापून आले आहे. म्हणजे आपल्या शेजारचे गृहस्त मरण पावतात हे आपल्याला सरळ समजत नाही. ती बातमी पेपरमध्ये छापून आल्यावर कळते.

आपण श्रीमंत झालो आहोत आणि करोडो किलोमीटर दूर असलेल्या मंगळाशी संबंध स्थापित करत आहोत. परंतु आपल्या शेजारी कोण राहते याचा आपल्याला पत्ता नाही. इतके आपण प्रगतीच्या नावावर निर्दय आणि अमानुष झालो आहोत. कै. केदारनाथ सहानी यांनी २०१३ साली आपल्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावाने प्रत्येकी ६ कोटी रुपये किंमतीचे दोन फ्लॅट ठेवून जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या विना त्यांच्या पत्नी आशा सहानी यांचे आयुष्य दुःखातच जात असेल हे खरे परंतु शेवटी मरण कोणाला चुकलेले नाही. पती गेले असले तरी अमेरिकेत नोकरी करणारा मुलगा आणि मुंबईत १२ कोटी रुपये किंमतीचे दोन फ्लॅट असल्यामुळे त्यांचे भौतिक जीवन तरी सुखी होते. परंतु आशादेवी सहानी यांचा मृत्यू अक्षरशः हृदय पिळवटून निघावे असा झाला. त्यांचा मुलगा ऋतुराज सहानी हा अमेरिकेत नोकरीस होता. तिथे त्याला छान पगार होता आणि तो आपल्या पत्नीसह तेथे स्थिर झाला होता. आपला मुलगा अमेरिकेत नोकरी करत असेल तर त्यापेक्षा अधिक अभिमानाची बाब कोणती असेल तेव्हा आशादेवी सहानी यांनाही आपल्या मुलाचे कौतुकच वाटत असणार परंतु त्यांचा मुलगा त्यांना नित्य भेटत नव्हता. तो काल त्यांना भेटायला म्हणून मुंबईत आला तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. म्हणून त्याने आपल्या खिशातल्या किल्लीने दार उघडले तर त्याला तिथे आपल्या आईचा शब्दशः सापळा दिसला.

या एका घटनेमध्ये आपल्या समाजातल्या किती शोकांतिका सामावलेल्या आहेत? ऋतुराज सहानी याने सांगितल्या प्रमाणे त्याच्या आईचा घरातच मृत्यू कधी झाला हे त्याला माहीत नाही आणि कशाने झाला याचा तर त्याला काहीच पत्ता नाही. परंतु ज्या अर्थी आईच्या शरीराचा सापळा झाला आहे त्या अर्थी तिच्या निधनाला किमान दोन ते तीन महिने झाले असणार. ऋतुराज याने आपल्या आईशी एप्रिलमध्ये फोनमध्ये एकदा बोलणे केले होते. त्यानंतर तो चार महिन्यांनी थेट तिला भेटायलाच आला. म्हणजे जी आपली आई मुंबईमध्ये एकाकी जीवन जगत आहे तिला एक फोन करायला त्याला चार महिने सवड मिळाली नाही. हा प्रकार केवळ ऋतुराज सहानी याच्याबाबतीतच घडला आहे असे नाही. तर परदेशात स्थायिक झालेल उच्चविद्याविभूषित मुले आपल्या आईवडिलांना महिनोंमहिने फोन करत नाहीत. जर एखाद्या वडिलांनाच आपल्या मुलाला फोन करावासा वाटला तर अमेरिकेत भरपूर पैसा कमावणारी बिझी मुले आपल्या वडिलांना आपण कामात असल्याचे सांगून फोन कट करतात आणि त्यांनी नंतर फोन करावा असे म्हणतात. नंतर काम संपल्यावर स्वतःहून आपल्या वडिलांना फोन करत नाहीत. ही एक शोकांतिका झाली.

दुसरी शोकांतिका म्हणजे या फ्लॅटमध्ये या बाई मरून पडलेल्या आहेत आणि त्यांच्या शरीराचे विघटन होत आहे याची शेजार्‍यांना तीळमात्र कल्पना नाही. त्यांना प्रेताचा वाससुध्दा आलेला नाही. मुंबईतली किंवा पुण्यातली फ्लॅट संस्कृती इतकी निर्दय आणि माणुसकीहीन झालेली आहे की एका फ्लॅटमध्ये जगणारा आत्ममग्न शेजारी आपल्या शेजारी एक वृध्द स्त्री राहते याची दखलसुध्दा घ्यायला तयार नाही. एखाद्या शेजार्‍याने या बाईंना एक दोन दिवसाआड तरी केवळ गुडमॉर्निंग म्हणण्याचे सौजन्य पाळले असते तर अडीच महिने त्यांचा मृतदेह असा बेवारस अवस्थेत पडला नसता. खरोखरच आपली समृध्दी, आपली श्रीमंती, आपले आलिशान फ्लॅट, आपल्या बँकांमधील ठेवी, मुलाची अमेरिकेतील नोकरी आणि त्याचे तिथले वैभव हे सगळे मातीमोल वाटावे असा हा प्रकार आहे. साधारण १९९० च्या दशकामध्ये परदेशी जाणारी मुले हा मातपित्यांसाठी कौतुकाचा विषय होता. परंतु आता आपला मुलगा अमेरिकेत जातो किंवा जर्मनीत राहतो ही गोष्ट त्याच्या माघारी भारतात एकाकी जीवन कंठणार्‍या या आईवडिलांना अक्षरशः शाप वाटायला लागले आहे. कारण मुलाच्या नोकरीच्या निमित्ताने ही वृध्द मंडळी अक्षरशः निराधार जीवन जगायला लागले आहेत.

Leave a Comment