रोज ऑफिसला पोहत जातो हा माणूस


जर्मनीच्या म्युनिख मधील एका कार्यालयीन कर्मचार्‍याने ऑफिसला जाण्यासाठी कमी त्रासाचा, वेळ वाचविणारा मार्ग शोधून काढला आहे. बेंजामिन डेव्हीड हा ४० वर्षीय कर्मचारी गेली दोन वर्षे दररोज नदीतून पोहत ऑफिस गाठतो आहे. आणि त्याची ही कल्पना त्याच्या कार्यालयातील अनेकांना फारच भावली असून त्यातील कांही जणही आता पोहत ऑफिसला येत आहेत असे त्याचे म्हणणे आहे.

वास्तविक बेंजामिनला रेल्वे अथवा बस, कारने ऑफिसला जाणे सहज शक्य आहे. तो अनेक वर्षे बाईकने गेलाही. मात्र घराबाहेर पडताच वाहनांच्या रांगां, धक्काबुक्की. वाहतूक कोंडी याने तो त्रासून जात असे. तो सांगतो जेव्हा मी बाईकने जायचो तेव्हा मला कारवाल्यांचा त्रास वाटायचा, सायकलने जायचा प्रयत्न केला तर पायी चालणार्‍यांच्या गर्दीला सामोरे जावे लागायचे. मग मी विचार केला तेव्हा लक्षात आले की आपल्या रस्त्याला लागूनच नदी आहे त्यातूनच आपण ऑफिसला जावे व हा विचार मी तत्काळ अमलात आणला.

बेंजामिन इसर नदी पोहून ऑफिसला पोहोचतो. याचे त्याला कांही फायदेही आहेत. एक तर वाहतूक कोंडीतून सुटका होते, वेळ वाचतो, घरातून अंघोळ करून निघावे लागत नाही शिवाय व्यायामही होतो. बेंजामिन आपला सूट, लॅपटॉप, मोबाईल, शूज व पाकिट वॉटरप्रूफ बॅगेत ठेवतो व ही बॅग पाठीवर घेऊन पोहतो. स्वित्झर्लंड मध्ये हा ट्रेंड खूपच लोकप्रिय आहे व बेंजामिन वापरतो ती बॅगही स्वित्जर्लंडमध्येच डिझाईन केली गेली आहे. तिला विकलफिश असे नांव आहे.

Leave a Comment